पाकिस्तानी गँगस्टर भट्टीशी कथित संपर्क, ATS ची राज्यात एकाचवेळी छापेमारी, दीडशेहून अधिक जणांची चौकशी

राज्यभर सुरू असलेल्या या कारवाईत संशयितांच्या सोशल मीडिया व्यवहारांची आणि डिजिटल उपकरणांची तपासणी केली जात आहे.

News Photo   2026 07 10T145836.473

पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी (Pakistan) याच्याशी कथित संपर्क असल्याच्या संशयावरून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) गेल्या महिन्यात कारवाई केली होती. यामध्ये चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरू होती. आता यासंबंधी अधिक माहिती मिळाल्याने महाराष्ट्र ATS ने आज ( 10 जुलै) राज्यात एकाचवेळी विविध शहरांत छापे टाकले आहेत. त्यामध्ये दीडशेहून अधिक जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.

हे तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानस्थित कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याचा सहकारी राणा भाई यांच्या संपर्कात असल्याची पोलिसांची माहिती आहे. त्यासाठी ठिकाणी एकाचवेळी शोधमोहीम राबवली जात आहे. मुंबई. ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या ठिकाणी ATS ची कारवाई सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा श्रीरामपूरमध्ये कारवाई सुरू आहे. याशिवाय राहुरी आणि अहिल्यानगर शहरातही कारवाई सुरू आहे.

राज्यभर सुरू असलेल्या या कारवाईत संशयितांच्या सोशल मीडिया व्यवहारांची आणि डिजिटल उपकरणांची तपासणी केली जात आहे. त्यांच्याविरोधात डिजिटल पुरावे गोळा करणे आणि या संपर्कांचे स्वरूप पडताळण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. यात अद्याप कोणालाही थेट अटक करण्यात आलेली नाही. तसेच एटीएसकडून अधिकृतपणे या कारवाईची माहितीही अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

शरद पवार NDA मध्ये जाणार? विविध चर्चांना तोंड फुटलेलं असतानाच सुप्रिया सुळेंचं फायनल उत्तर आलं

जून महिन्यात अहिल्यानगरमधील एटीएसच्या पथकाने श्रीरामपूरमध्ये अशी कारवाई केली होती. तेथून चौघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांचे मोबाईल आणि इतर उपकरणे तपासण्यात आली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. नात्र, त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येत होती. त्यानंतर आज राज्यभर अशीच कारवाई सुरू आहे.

कोण आहे शहजाद भट्टी?

शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील एक कुख्यात गँगस्टर, गुन्हेगारी नेटवर्कचा म्होरक्या आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. त्याने सुरुवातीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ तयार करून एक ‘इन्फ्लुएन्सर’ म्हणून ओळख मिळवली होती. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये तो धर्म, भारत-पाकिस्तान संबंध आणि प्रक्षोभक विषयांवर भडक मते मांडायचा. त्याच माध्यमातून तो भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील आणि पंजाबमधील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढू लागला.

हळूहळू छोट्या गोष्टी करायला सांगत तो तरुणांना देशविरोधी कृत्यांसाठी आणि कट्टरतावादाकडे प्रवृत्त करू लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार झीशान अख्तरला भारताबाहेर पळून जाण्यास मदत केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. एकेकाळी शहजाद भट्टीचे भारतातील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सोबत मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यांचे व्हिडिओ कॉल देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, नंतर त्यांच्यात वाद झाला.

follow us