Rohit Pawar : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची (Budget Session) सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष (NCPSP) आक्रमक पाहायला मिळाला आहे. कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आज ‘दलालीची दलाल’ पत्रिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे उघडकीस आणले आहे. या पत्रिकेच्या माध्यमातून त्यांनी सरकारचे 11 घोटाळे बाहेर काढले आहे.
रुग्णवाहिका घोटाळा, दूध घोटाळा, भोजन पुरवठा घोटाळा, MSIDC घोटाळा, कंत्राटी भरती घोटाळा, MIDC जमीन घोटाळा, आनंदाचा शिधा घोटाळा, पुणे रिंग रोड घोटाळा, समृद्धी महामार्ग घोटाळा, MSRDC घोटाळा आणि रक्तपेढी परवानगी घोटाळ्यांवर त्यांनी या पत्रिकेच्या माध्यमातून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लक्ष वेदन्याचा प्रयत्न केला आहे. ‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ असंच महायुती सरकारचं सूत्र असून दलालीच्या पैशातून महाराष्ट्राचा स्वाभिमान विकत घेण्याचे हे मनसुबे आहेत. असा आरोप देखील त्यांनी यावेळी महायुती सरकारवर केला.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, सत्तेत असलेल्या नेत्यांनी काल प्रेस घेतली आणि या प्रेसमध्ये आमच्या सगळ्या गोष्टी किती चांगल्या हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण कालची पीसी म्हणजे गंमतीजमती जास्त होते. अशी टीका त्यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर केली. तसेच सरकार खोटे बोलत आहे. महाराष्ट्रात 531 रूपये टू व्हिलर नंबर प्लेटला लागतोय पण गुजरातमध्ये टू व्हिलर नंबर प्लेटसाठी 150 रूपये घेतात. असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.
तसेच त्यांनी यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणावरुन देखील सरकारवर टिका केली आहे. यावेळी रोहित पवार म्हणाले की, राहूल गांधी यांची सिव्हील केस होती मात्र तरी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली मात्र इथे क्रिमिनल केस आहे. सरकारला फसवण्यात आले आहे. तरीही कृषीमंत्र्यांवर करावाई करण्यात येत नाही. तर मुंडेच्या प्रकरणात त्यांचा जवळच्या माणूस किंगमेकर आहे. कोणी काही ही बोललो तर आम्ही घाबरत नाही अशी सरकारची मानसिकता आहे. आज काहीतरी होईल अशी अपेक्षा आहे. आम्ही वाट पाहत आहोत की राजीनामा घेतला जाईल. असं देखील आमदार रोहित पवार म्हणाले.