Governor of Maharashtra : महाराष्ट्रात गुंडगिरी आणि दादागिरी आहे. चांगल्या लोकांसह महाराष्ट्रात गुंड आणि दाऊदही आहे, असं वादग्रस्त वक्तव्य मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. नवी मुंबईमध्ये आज एका कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी बोलताना कोश्यारी यांनी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रबद्दल प्रेम व्यक्त केले. महाराष्ट्रचे लोक आमच्या पहाडी लोकांसारखे चांगले आहेत. पण शहरात काही गुंडगिरी करणारे दाऊद सारखे लोक आहेत. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी मराठी वाचतो. तर मराठी आणि पहाडी भाषेत अनेक शब्द मिळते जुळते आहेत. आमच्याकडे पांडे आहे इकडे देशपांडे आहेत. इथे राऊत आहेत तर आमच्याकडे रावत आहेत”
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केल्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. बैस हे महाराष्ट्राचे २० वे राज्यापाल आहेत. रमेश बैस हे आधी झारखंडचे राज्यपाल होते. महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही नव्या राज्यपालांचं स्वागत करत भाजपला टोला दिला.
आपल्या ट्विटमध्ये राऊत यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्रला नवे राज्यपाल मिळाले. आनंद आहे.राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे.राजभवनाचे भाजपा कार्यालय करु नये असे मत व्यक्त होताच भाजपास मिरच्या का झोंबाव्यात? राज्याने कटू अनुभव घेतला आहे.राज्यपाल महाराष्ट्रला मिळाले फक्त भाजपाला नाही याचे भान ठेवले तरी पुरे”
संजय राऊत याच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी हा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर आक्रमक भूमिका घेतली होती.