Download App

साखर सम्राटांना दणका! गाळपाआधीच तब्बल 45 कारखान्यांना लागणार टाळे?

Sugar Factory News : राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम (Sugar Factory) अगदी तोंडावर आलेला असतानाच साखरसम्राटांना दणका देणारी कारवाई होणार आहे. पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील तब्बल 45 साखर कारखाने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईने राज्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. गाळप हंगाम सुरू करण्याआधी प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच पर्यावरण संवर्धन कायद्याच्या नियमांचे पालन करण्याचीही सक्ती आहे. मात्र, कारखान्यांकडून या नियमांचे पालन केले जात नाही.

Jitendra Awhad : ‘हे पाहून वाईट वाटलं, दुःख झालं..! आव्हाडांच्या निशाण्यावर अजितदादा?

नदीपात्रात दूषित पाणी सोडणे, रसायनमिश्रित मळी टाकणे उसाच्या चिपाडाच्या कणांनी हवा प्रदूषित होणे असे प्रकार सर्रास होतात. त्यामुळे कारखान्यांच्या या हलगर्जीपणाच्या कारभाराविरोधात तक्रारीही केल्या जातात. त्यामुळे आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील 45 कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.  पर्यावरण संवर्धनाच्या नियमांचे उल्लंघन साखर कारखान्यांनी केल्याने केंद्रीय मंडळाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवून 45 साखर कारखाने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या कायद्याच्या कलम 5 नुसार ही कारवाई करण्याचे अधिकार असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या पत्रात म्हटले आहे.

10 नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करा 

या कारवाईस पात्र कारखान्यांचा पाणी आणि वीजपुरवठा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय प्रदूषण मंडळाकडून जोपर्यंत हा आदेश रद्द केला जात नाही तोपर्यंत कोणताही कारखाना सुरू केला जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी अशा सूचना आहेत. येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा वाद चिघळला; नांदेडात खासदाराच्या गाड्या फोडल्या

1 नोव्हेंबरपासून गाळप हंगामाला सुरुवात 

दरम्यान, राज्यात यंदा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. राज्यात जवळपास 190 साखर कारखाने आहेत. यातील 105 कारखान्यांनी गाळपाची तयारी पूर्ण केली आहे. बहुतेक कारखान्यांनी हंगामाला सुरुवातही केली आहे. त्यातच कारवाईचे पत्र येऊन धडकल्याने राज्यातील साखर उद्योगात खळबळ उडाली आहे. राज्यातील बहुतांश साखर कारखाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह अन्य पक्षांच्या नेत्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे या नेतेमंडळींकडून हालचालींना सुरुवात झाली आहे. साखर कारखानदारांकडून केंद्रीय नेत्यांशी समन्वय साधून यावर तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.  त्यामुळे या कारवाईत किती कारखाने बंद पडतील याची खात्री आताच देता येणार नाही. यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

Tags

follow us