बुलढाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. बस डिव्हायडरला धडकून, टायर घासल्याने आणि डिझेल टँक फुटल्याने बसने पेट घेतला आणि 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने 8 जणांचा जीव वाचला असून ते सर्व किरकोळ जखमी आहेत. त्यांच्यावर सिंदखेडराजा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Samruddhi highway Vidarbha travels bus accident Buldhana 26 died)
दरम्यान, आतापर्यंतचा समृद्धी महामार्गावरील हा सर्वात मोठा अपघात आहे. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर जवळपास विविध अपघातांमध्ये 300 हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन महिन्यात 350 अपघात 50 लोकांचा बळी गेला आहे. या अपघातांच्या मालिकांमुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेवर वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चार दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही राष्ट्रीय महामार्ग आणि समृद्धी महामार्ग यातील फरक सांगत आणि त्रुटींवर बोट ठेवत समृद्धीचे वाभाडे काढले होते.
मोदी सरकारच्या 9 वर्षपूर्तीनिमित्त (27 जून रोजी) दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना नितीन गडकरी बोलत होते. यावेळी बोलताना गडकरी यांनी 9 वर्षांच्या काळातील रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी समृद्धीविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना ते म्हणाले, समृद्धी हा राज्य सरकारचा प्रकल्प आहे. त्याची मालकी राज्य सरकार आणि एमएसआरडीसीकडे आहे. या रस्त्याशी केंद्राचा संबंध नसला तरीही या रस्त्यांवरील अपघातांबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. या मार्गावरील अपघात कमी व्हावेत यासाठी पुन्हा त्यांच्याशी चर्चा करणार आहे.
राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती करताना आम्ही मार्गाच्या दुतर्फा ठराविक अंतरावर प्रसाधन गृह आणि विसाव्याची व्यवस्था करतो, अपघात प्रणव जागा शोधून त्रुटी दूर करतो. नागपूर ते मुंबई समृद्धी मार्गावर याचा अभाव आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आम्ही बनवला होता. त्यावर एका सामाजिक कार्यकर्त्याने अभ्यास करून 60 चुका शोधून काढल्या होत्या. त्या पुढे सरकारने दुरुस्तही केल्या, असे गडकरी म्हणाले होते.