महाराष्ट्र साहित्य परिषदेत सत्ताबदल, योगेश सोमण यांच्या नेतृत्वाखाली नवी कार्यकारणी

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत मोठा राजकीय बदल घडला असून योगेश सोमण यांच्या नेतृत्वाखालील साहित्य संवर्धन पॅनेलने विजय मिळवला आहे.

Untitled Design 31

Untitled Design 31

Change of power in Maharashtra Sahitya Parishad : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत मोठा राजकीय बदल घडला असून योगेश सोमण यांच्या नेतृत्वाखालील साहित्य संवर्धन पॅनेलने विजय मिळवला आहे. या निकालामुळे अनेक वर्षांनंतर परिषदेचा कारभार नव्या कार्यकारिणीकडे जाणार आहे. या निवडणुकीकडे राज्यातील साहित्यवर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. अध्यक्षपदाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत योगेश सोमण यांनी परिवर्तन उत्कर्ष पॅनेलचे उमेदवार मिलिंद जोशी यांचा पराभव करत अध्यक्षपद पटकावले.

त्यामुळे परिषदेच्या नेतृत्वात मोठा बदल घडला आहे. त्याचबरोबर प्रमुख कार्यवाह या महत्त्वाच्या पदावर साहित्य संवर्धन पॅनेलच्या स्वाती महाळंक यांनी विजय मिळवला. त्यांनी परिवर्तन उत्कर्ष पॅनेलकडून उभ्या असलेल्या सुनिताराजे पवार यांचा पराभव केला. कोषाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत साहित्य संवर्धन पॅनेलचे प्रदीप निफाडकर विजयी झाले. त्यांनी परिवर्तन उत्कर्ष पॅनेलचे उमेदवार विनोद कुलकर्णी यांना पराभूत केले. त्यामुळे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या तीन महत्त्वाच्या पदांवर साहित्य संवर्धन पॅनेलचे उमेदवार निवडून आले आहेत.

स्थानिक कार्यवाह पदांसाठीही चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत साहित्य संवर्धन पॅनेलकडून सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार आणि नितीन संगमनेरकर हे उमेदवार विजयी झाले. तर परिवर्तन उत्कर्ष पॅनेलकडून अंजली कुलकर्णी, माधव राजगुरू आणि आशुतोष जावडेकर यांनी विजय मिळवला. अशा प्रकारे स्थानिक कार्यवाह पदांवर दोन्ही पॅनेलचे उमेदवार निवडून आले असले तरी एकूण संख्याबळ साहित्य संवर्धन पॅनेलकडे अधिक आहे.

बीड विवाहितेचा अत्याचार प्रकरण; आता पोलिस पाटील, ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल होणार

दरम्यान, महाराष्ट्र साहित्य परिषदेची मागील निवडणूक 2016 मध्ये झाली होती. त्यानंतर 2021 मध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्यकारिणीला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे जवळपास दहा वर्षांनंतर ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव झाला असून साहित्य संवर्धन पॅनेलने परिषदेवर सत्ता मिळवली आहे.

या निवडणुकीला आणखी एक महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. कारण पुढील वर्षी होणारे ऐतिहासिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे शतकीय म्हणजेच 100वे साहित्य संमेलन असणार आहे. हे संमेलन पुणे येथे होणार असून त्याच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे असणार आहे. त्यामुळे नव्या कार्यकारिणीसमोर या ऐतिहासिक संमेलनाच्या यशस्वी आयोजनाचे मोठे आव्हान असणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेची ही निवडणूक विविध कारणांमुळे चर्चेत होती. निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोप झाले, विविध गटांमध्ये वाद झाले आणि साहित्यवर्तुळात मोठी चर्चा रंगली. मात्र अखेरीस मतदारांनी स्पष्ट कौल देत साहित्य संवर्धन पॅनेलला विजय मिळवून दिला आहे. निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्षपदी योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदी स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्षपदी प्रदीप निफाडकर यांची निवड झाली आहे.

तर स्थानिक कार्यवाह म्हणून सुनील महाजन, अंजली कुलकर्णी, सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार, माधव राजगुरू, नितीन संगमनेरकर आणि आशुतोष जावडेकर यांचा समावेश आहे. यामुळे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या साहित्यिक संस्थेच्या नेतृत्वात आता नवे नेतृत्व पुढे आले असून पुढील काळात परिषदेच्या कामकाजाची दिशा काय असेल, याकडे साहित्यविश्वाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version