Download App

उत्सव शिवजयंतीचा! माँजिजाऊंमुळे शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य विदर्भातही विस्तारलेलं; वाचा सविस्तर

नारोपंत हणमंते हे शहाजी राजेंच्या बंगळूर दरबारात प्रमुख मुत्सद्दी व मुजुमदार होते. त्यांचे पुत्र जनार्दनपंत आणि रघुनाथपंत हणमंते

  • Written By: Last Updated:

Jijau went to South India : जिजाऊसाहेबांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्यासोबत झाल्यानंतर विदर्भातील काही विश्वासू व्यक्ती त्यांच्यासोबत गेल्या आणि पुढे स्वराज्य स्थापनेत मोलाची भूमिका बजावली. (Jijau) विदर्भ हा केवळ शिवशक्तीचा उगमस्थळ नसून, स्वराज्य स्थापनेतही त्याचा मोठा वाटा आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचा जन्म विदर्भातील सिंदखेडराजा येथे झाला. विशेषतः नारोपंत हणमंते आणि गोमाजी नाईक पानसंबळ यांचे योगदान शिवकालीन इतिहासात अजरामर आहे.

महानायकाची गाथा;धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज!

कर्नाटक मोहिमेचे नायक

नारोपंत हणमंते हे शहाजी राजेंच्या बंगळूर दरबारात प्रमुख मुत्सद्दी व मुजुमदार होते. त्यांचे पुत्र जनार्दनपंत आणि रघुनाथपंत हणमंते हेही कर्नाटकातच वाढले. १६६४ मध्ये शहाजी राजेंच्या निधनानंतर हणमंते कुटुंब व्यंकोजी राजांच्या सेवेत तंजावरला गेले. परंतु, १६७५ साली व्यंकोजी राजांशी झालेल्या वादानंतर जनार्दनपंत आणि रघुनाथपंत रायगडावर आले. त्यांनी शिवाजी महाराजांना कर्नाटक मोहिमेसाठी प्रेरित केले. यामुळे हिंदवी स्वराज्याचा विस्तार दक्षिण भारतात झाला. पुरंदरच्या तहाच्या वेळी शिवाजी महाराजांच्या वतीने मिर्झाराज जयसिंग यांच्याशी वाटाघाटी करणारे नारोपंत हणमंतेच होते. त्यामुळे त्यांच्या मुत्सद्देगिरीचे मोठे महत्त्व आहे.

प्रतापगड युद्धातील योद्धा

गोमाजी नाईक पानसंबळ हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. १६५९ मध्ये अफझलखानाविरुद्ध प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या ऐतिहासिक युद्धात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. युद्धाच्या पूर्वसंध्येला महाराजांनी मुत्सद्दी मंडळात अफझलखानाच्या भेटीस कसे जावे, यावर सल्ला विचारला. त्यात गोमाजी नाईक पानसंबळ यांचा मोठा वाटा होता.

विदर्भातील मावळ्यांचे अमूल्य योगदान

शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य केवळ पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकणापुरते मर्यादित नव्हते. विदर्भातील अनेक योद्ध्यांनी, मुत्सद्द्यांनी आणि वीरांनी स्वराज्यासाठी मोलाची कामगिरी केली. नारोपंत हणमंते आणि गोमाजी नाईक यांच्यासारखे पराक्रमी वीर स्वराज्याच्या उभारणीत अग्रेसर होते. विदर्भातील हे शूर मावळे शेवटपर्यंत स्वराज्यासाठी लढले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य साकार करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. त्यामुळे शिवाजी महाराज जयंतीला त्यांच्या योगदानाची आठवण करून देणे हीच खरी आदरांजली ठरेल.

follow us