Waghya Statue Controversy : रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन वाद निर्माण झाला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या विषयाला वाचा फोडली. (Statue ) त्यात त्यांनी वाघ्या कुत्र्याचे स्मारक रायगडावरून हटवण्यात यावे, अशी मागणी केली. त्यानंतर त्यांच्या मागणीला विरोध करणारा गटही समोर आला. आता या विषयातील सत्य समोर आणण्यासाठी इतिहासकारांची समिती नेमावी अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.
काय म्हणाले उदयनराजे ?
उदयनराजे वाघ्या कुत्र्याबाबत बोलताना म्हणाले, वाघ्या, वाघ्या कोण वाघ्या? देशात एकच वाघ होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासात कुठेही वाघ्या कुत्र्याची नोंद नाही. तर सत्य शोधण्यासाठी इतिहासकारांची समिती बसवा. त्या वाघ्या कुत्र्याबाबत धनगर समाज, होळकर यांचा संबंध काय? असा प्रश्न त्यांनी विचारला.
कायदा का केला नाही?
महापुरुषांविरोधात वक्तव्य करणारा हा कायदा अजामीनपात्र करा. याबाबत अधिवेशन बोलवलं नाही तर त्याचा अर्थ असा होईल की यांना शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अवमान मान्य आहे. हा कायदा तुम्ही पारीत केला तर राहुल सोलापूरकर, कोरटकर यासारखी लोक धाडस करणार नाही. या कायद्यात महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा करण्याची तरतूद केली पाहिजे असंही ते म्हणाले.
लोकशाही ढाचा शिवाजी महाराजांनी रचला. महाराजांच्या रूपाने देव पाहायला मिळाला. महाराज युगपुरुष होते. त्यांची काही जणांकडून अवहेलना केली जाते. त्यामुळे यासंदर्भात कायदा केला पाहिजे. कायदा बनवायला बजेटची गरज नसते. आता हा कायदा करुन फास्ट ट्रॅक कोर्ट माध्यमातून ट्रायल झाली पाहिजे.
अरबी समुद्रात शिवाजी महाराज स्मारकाची घोषणा करण्यात आली होती. त्याचे भूमीपूजनही झाले. त्या समारंभास मी होतो. परंतु, शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी साधा १ रुपयासुद्धा दिला नाही. मुंबईसारख्या ठिकाणी महाराजांचे स्मारक झालंच पाहिजे, असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.