Eknath Shinde ON Shivsena Advertisement: ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेकडून देण्यात आली होती. यावरुन भाजप आणि शिवसेनेत मतभेद असल्याची चर्चा सुरु होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असेल, नसेल पण आम्ही दोघेही लोकांच्या मनात आहेत, हे सगळ्यात महत्वाचे आहे. शिवसेना-भाजप ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे. स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, सत्तेसाठी आणि मला काही मिळेल यासाठी युती झालेली नाही. म्हणून ही युती भक्कम आहे. शिवसेना-भाजप महायुती येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यांवर जिंकेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुंबई येथे पत्रकारांशी संवाद.. (१३/६/२०२३) https://t.co/UqTooJE0tH
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 13, 2023
मुख्यमंत्री पुढं म्हणाले की आमचे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. डबल इंजिनचे सरकार आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मोठा निधी जातो म्हणूनच महाविकास आघाडीच्या काळात मेट्रो सारखे प्रकल्प, पायाभूत सुविधांचे प्रकल्प बंद होते. पण आमचे सरकार आल्यावर आम्ही हे प्रकल्प सुरु केले. मुंबईतच नाहीत तर संपूर्ण राज्यातील प्रकल्प मोठ्या गतीने सुरु आहेत. म्हणूनच राज्यातील जनतेने आशिर्वाद दिले आहेत, प्रेम दिले आहे.
‘फडणवीसांना विसरा पण, बाळासाहेबांना तरी विसरू नका’; ‘त्या’ जाहिरातबाजीवर भुजबळांचा संताप
मुख्यमंत्री म्हणाले की, मला काही टक्के दिले आहेत. उपमुख्यमंत्र्यांना पसंती दिली आहे. आम्ही दोघे या राज्याचे प्रमुख नेतृत्व करतोय. या राज्याला पुढं नेतोय, राज्याचा सर्वागीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही प्रत्यक्ष फिल्डवर उतरुन काम करतो आहेत. घरात बसून काम करत नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहोत. मुंबई बदलतीय, विकास होताय. सर्व सामान्य जनतेला हवा असलेला विकास या राज्यात दिसू लागला आहे. म्हणून राज्यातील जनतेने एका सर्व्हेच्या माध्यमातून मला आणि उपमुख्यमंत्र्यांना पसंती दिली आहे. लोकांचा मी आभारी आहे. आमच्यावर जबाबदारी वाढली आहे. आम्ही अधिक जोमाने काम करु, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिंदे आणि फडणवीस आज एकत्र कोल्हापूरला जाणार होते पण…?
मंत्रिमंडळ बैठकीबद्दल सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की अतिवृष्टी गारपीटीने नुकसान झालेल्यांना एनडीआरएफपेक्षा जास्त मदत देण्याचा निर्णय सरकराने घेतलेला होता. दोन हेक्टरची मर्यादा वाढवून तीन हेक्टरची मर्यादा केली आहे. नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता पण त्याची अंमलबाजवणी केली नव्हती. आमच्या सरकारने या निर्णयाची अंमलबाजवणी केली आहे. सततच्या पावसाने होणारे नुकसान नैसर्गिक आपत्तीत धरावं आणि शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.