Download App

मी आदित्य अन् रश्मी वहिनी एका खोलीत थांबलो; सीएम फडणवीसांनी सांगितला 2019 चा A टू Z पट

अमित शहांनी सांगितलं की, त्यांना सांगा हे चालणार नाही. आम्ही अडीच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्रिपद देऊ शकत नाही. असं असेल तर

  • Written By: Last Updated:

CM Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठवणारी घटना घडली ते साल 2019. त्या गोष्टीची सातत्याने चर्चा होते किंवा घडवन आणली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर नुकतच भाष्य केलं. (Fadnavis ) बाळासाहेबांच्या खोलीत शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यावरून बैठक झाली होती यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. निकालानंतर ठाकरे माझा फोनही घेत नव्हते, त्यांचं शरद पवारांसोबत आधीच ठरलं होतं, असा थेट घणाघात फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस काय म्हणाले?

लोकसभा निवडणुका होत्या, आम्ही युतीसाठी बसलो. एके रात्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, की देवेंद्रजी, आम्हाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद हवं आहे. मी तुमच्या वरिष्ठांच्याही कानावर ही गोष्ट घातली आहे. अंतिम निर्णय आज घेऊन टाकू. रात्रीचा १ वाजला होता. मी म्हटलं, की मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. आमचे पार्लमेंट्री बोर्ड निर्णय घेते. मी अमित शहांशी बोलतो. रात्री एक वाजताच मी शाहांना फोन केला, त्यांना सांगितलं की जागावाटपावर तर आमचा अंतिम निर्णय झालाय, पण त्यांचं म्हणणं आहे की अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद हवं, असं फडणवीस म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे-भाजप पुन्हा एकत्र येणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

अमित शहांनी सांगितलं की, त्यांना सांगा हे चालणार नाही. आम्ही अडीच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्रिपद देऊ शकत नाही. असं असेल तर युतीच होणार नाही. कारण आम्ही सर्वात मोठा पक्ष आहोत. फार तर आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्रिपद देऊ. मग ठाकरे म्हणाले, की मग काही होऊ शकत नाही. शेवटी ते त्यांच्या वाटेने गेले आणि आम्ही आमच्या, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

चार दिवसांनी ठाकरेंचा पुन्हा मेसेज

चार दिवसांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून संदेश आला, की आपण पुन्हा चर्चा करुया. मी म्हटलं आता नव्याने तर बोलणी होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे जर अडीच वर्षांवर अडून राहणार असतील, तर आमचा पक्षही ऐकून घ्यायला तयार नाही. त्यांचे नेते म्हणाले, नाही उद्धवजींनी ती अट सोडून दिली आहे. फक्त एखादी जागा वाढवून द्या. पालघरची जागा सोडा, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. मी तयार नव्हतो. कारण पालघर आम्ही पोटनिवडणुकीत जिंकली होती. शेवटी अमित शहांनी सांगितलं, आपण जुने दोस्त आहोत. म्हणून आम्ही उमेदवारासकट ती जागा त्यांना दिली, असं फडणवीस म्हणाले.

मला अमित शहांसोबत बोलायचं

आमची पत्रकार परिषद ठरली होती. त्याच्या आदल्या दिवशी त्यांचा फोन आला. की आधी अमित भाई मातोश्रीवर यावेत, म्हणजे आमचाही थोडा आब राहील. मी शाहांना सांगितलं. ते म्हणाले, की ठीक आहे, पण कुठलीही चर्चा ओपन नका करु. त्याच्या एक तास आधी मला ठाकरेंचा फोन आला, की मला अमित शहांसोबत बोलायचं आहे. गेल्या पाच वर्षात आमच्या ज्या तक्रारी होत्या, त्या त्यांच्या कानावर घालायच्या आहेत, म्हणजे पुढे गोष्टी सुरळीत होतील, असं फडणवीस म्हणाले.

मातोश्रीवर चर्चा

मातोश्रीवर आम्ही पोहोचलो. बाळासाहेब ठाकरे यांची खोली होती. आदित्य, मी आणि रश्मी वहिनी एका खोलीत होतो. मी उद्धव ठाकरेंना आठवण करुन दिली, की तुम्हाला बोलायचं आहे ना अमित भाईंशी. त्यांनी दहा मिनिटं चर्चा केली. मला नंतर आत बोलावण्यात आलं. मला सांगितलं, की आमचं असं ठरलंय, एक चेहरा द्यायचा आहे, पत्रकार परिषदेत सांगा की सत्तेत आम्हाला सहभाग मिळेल, मी एकटा पत्रकार परिषदेत बोलेन असं ठरलं. मी काय-काय बोलायचंय ते त्यांना बोलून दाखवलं, मग हिंदीत बोलून दाखवलं, मग त्यांनी वहिनींसमोर मला बोलायला सांगितलं, त्यांनी रश्मी वहिनींना बोलावलं. मग कॅसेट सारखं मी पुन्हा बोलून दाखवलं. त्यांनी सांगितलं की चांगलं झालं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

follow us