Sadabhau Khot : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण आणि देवेंद्र फडणवीस हे अर्जून आहेत. तर शरद पवार हे शकुनी मामा आहेत अशी वक्तव्य रयत क्रांतीचे प्रमुख आमि महायुतीचे विधान परिषद आमदार (Sadabhau Khot) सदाभाऊ खोत यांनी केले आहेत. ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी सांगलीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी केलेल्या राजकीय टिप्पणीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
फडणवीसांकडे सगळे भुरटे चोर; मनोज जरांगेंची सदाभाऊ खोतांवर तुफान फटकेबाजी
मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिलेले पहिलं आरक्षण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी घालवलं असा थेट आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे नावाच्या वाघाने बंड केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने मविआचे सरकार पाडून महायुतीचे पुन्हा सरकार आणलं. राज्य कसे चालवावे याचा दुरदृष्टीपणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना सर्वांनी घेरलं आहे. कारण फडणवीसच आपल्याला फाइट देऊ शकतात हे शरद पवारांना कळलं आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
प्रस्थापितांना धक्का
मराठा समाजाचे आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. पण यापैकी कोणत्याही मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. मात्र, 2019 साली मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी पहिलं आरक्षण मिळवून दिलं. पण शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला मिळालेले हे आरक्षण घालवलं. मात्र, या दोघांवर टीका झाली नाही , टीका झाली ती देवेंद्र फडणवीस यांच्यावर. कारण प्रस्थापितांना धक्का देण्याचं काम फडणवीस यांनी केलं होतं. त्यामुळे शरद पवार महाराष्ट्रच्या राजकारणाततील शकुनीमामा आहेत अशी टीका खोत यांनी केली आहे.
शरद पवारांनीच मराठा समाजाची माती केली, सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सदाभाऊ खोत यांना राजकीय धक्का दिला होता. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटात प्रवेश केला होता. भानुदास शिंदे गेल्या 25 वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करत आहेत, अनेक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. शरद जोशी यांच्या संघटनेत त्यांनी कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांचा शरद पवार गटातील पक्षप्रवेश विधानसभा निवडणुकीपूर्वी रयत क्रांती आणि सदाभाऊ खोत यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.