बैठकीमध्ये नेमकं ठरलं काय होतं?, अजित पवार सत्ता सोडणार की, शरद पवार भाजपसोबत जाणार?
दोन्ही पक्षांचे विलीनीकरण झाल्यास ज्येष्ठ नेते शरद पवार हे भाजपसोबत गेले असते की, अजित पवार हे सरकारमधून बाहेर पडले असते?
What was decided in the meeting between Sharad Pawar and Ajit Pawar? : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील संभाव्य विलीनीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काही बैठक झाल्या होत्या, हे आता जवळपास सर्वांनी मान्य केले आहे. मात्र, त्या बैठकांमध्ये नेमका कोणता फॉर्म्युला ठरला होता, कोणत्या अटींवर चर्चा झाली होती आणि विलीनीकरणानंतरची सत्तासमीकरणे कशी असणार होती, याबाबत अद्यापही संशयाचे धुके कायम आहे. राजकीय वर्तुळात सध्या सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की, विलीनीकरण झाल्यास ज्येष्ठ नेते शरद पवार हे भाजपसोबत गेले असते की, अजित पवार हे सरकारमधून बाहेर पडले असते? मात्र, या मुद्द्यावर दोन्ही गटांकडून कोणतीही ठोस स्पष्टता समोर येऊ शकलेली नाही.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय होती?
या बैठकांना उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ नेत्याच्या दाव्यानुसार, चर्चेदरम्यान अजित पवार गटाची भूमिका स्पष्ट होती. आज्जीच्या पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून कायम राहावेत आणि भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा सुरू राहावा, अशी मांडणी त्यांनी केली होती. मात्र, या मुद्द्यावर दोन्ही गटांमध्ये एकमत होऊ शकले नव्हते. विलीनीकरणाबाबतची चर्चा ही केवळ शरद पवार गटातील काही नेत्यांच्या विनंतीनंतरच सुरू झाली होती. सुरूवातीला अजित पवार हे अशा चर्चेसाठी राजी नव्हते. मात्र, कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या प्रक्रियेला होकार दिला, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
भाजपची भूमिका अनुकूल नव्हती?
या सगळ्या प्रक्रियेत भाजपची भूमिका महत्वाची मनाली जाते. दिल्लीतील भाजप नेतृत्व विलीनीकरणाबाबत फारसे अनुकूल नव्हते, विशेषतः शरद पवार यांना सोबत घेण्यास भाजप नेतृत्वाची तयारी नव्हती, अशी प्राथमिक माहिती आहे. तरी देखील अजित पवार गटाने विलीनीकरणाची चर्चा सुरू ठेवली होती. कारण, भविष्यात शरद पवार गट भाजपसोबत जाण्यास तयार झाला, तर भाजप नेतृत्वाला देखील तसं समजावून सांगता येईल, असा अजित पवार गटाचा होरा होता, अशा प्रकारच्या चर्चा देखील सध्या सुरू आहेत.
काही नेत्यांवरून मतभेद
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरूवातीला अजित पवार गटाने शरद पवार गटातील एक-दोन बड्या नेत्यांना चर्चेपासून दूर ठेवण्याचा आग्रह धरला होता. तसेच, विलीनीकरण झाल्यास त्यांना कोणतीही महत्वाची पदे देऊ नयेत, अशी देखील भूमिका होती. मात्र पुढील चर्चांमध्ये त्या नेत्यालाच प्रक्रियेत सहभागी करून घेण्यास अजित पवार गट तयार झाला. शरद पवार गटातील काही मोठ्या नेत्यांचा विलीनीकरणाचा पाठिंबा होता, मात्र विलीनीकरणानंतर भाजपसोबत जाण्याला त्यांचा तीव्र विरोध होता. मात्र भविष्यात अशी वेळ आलीच, तर त्या नेत्यांनी आपला वेगळा निर्णय घ्यावा आणि त्यांची चिन्नता करू नये, यावर दोन्ही बाजूंमध्ये एकमत झाल्याची देखील माहिती आता समोर येत आहे.
भारताविरोधातील सामन्यावर बहिष्कार टाकल्यानंतर आयसीसीने पाकिस्तानला सुनावले खडेबोल
12 फेब्रुवारीला होता विलीनीकरणाचा मुहूर्त?
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार गटातील अनेक नेता विलीनीकरणाची अनेक बैठक झाल्या असल्याचं उघडपणे सांगत आहेत. काही नेत्यांच्या दाव्यानुसार 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाचा मुहूर्त ठरला असल्याचं देखील बोलल जात आहे. मात्र, विलीनीकरणानंतर केंद्र आणि राज्यात भाजपला एकत्रित राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळणार होता का, की अजित पवार सरकारमधून बाहेर पडून राष्ट्रवादी विरोधी पक्षात बसणार होती, याबाबत शरद पवार गटातील एकाही नेत्याने स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. दुसरीकडे, अजित पवार गटाने देखील या विषयावर मौन बाळगले आहे.
दोन्ही बाजूंनीच अस्पष्टता कायम
विलीनीकरणाची चर्चा झाली होती आणि जवळपास सर्व काही ठरले होते, असा दावा केला जात असला, तरी विलीनीकरणानंतरचा सत्तेचा फॉर्म्युला काय असणार होता, याबाबत दोन्ही बाजूंनी अद्यापही स्पष्ट उत्तर दिलेले नाही.
अजित पवार गटाचे इतर नेते कुठे?
विलीनीकरणाच्या संदर्भात सध्या जो कथित व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे, त्यामध्ये केवळ शरद पवार गटाचेच नेते दिसत आहेत. अजित पवार यांच्याशिवाय त्यांच्या गटातील इतर कोणताही नेता त्या चर्चेत का दिसत नाही, हाही प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून अनेक दावे, प्रतिदावे आणि तर्क-वितर्क सुरू असले, तरी नेमकं काय ठरलं होतं, याच उत्तर अजूनही अनुत्तरीतच आहे.
