उपवर्गीकरण वाद भाजपमध्येच पेटला; माजी खासदाराची आमदार गोरखेंवर टीका
Amar Sable : तीच व्यक्ती आता मातंग समाजाला वाढीव आरक्षण मिळावे म्हणून उपवर्गीकरणाचा मुद्दा घेऊन, संपूर्ण अनूसूचित जातीमध्ये बुध्दीभेद करताना दिसतोय.
Amar Sable On Amit Gorkhe : राज्यात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा (sc sub categorization) मुद्दा गाजत आहे. या उपवर्गीकरणाला काही जातींचा पाठिंबा आहे, तर काही जातींचा तीव्र विरोध दर्शविला आहे. त्याविरोधात आक्रमक आंदोलनाची भाषा केली जात आहे. आता पिंपरी-चिंचवडमध्ये माजी राज्यसभा खासदार अमर साबळे (Amar Sable) व विधानपरिषदेचे सदस्य अमित गोरखे यांच्यामध्येच वाद पेटला आहे. दोघेही भाजपचे आहेत. गोरखे यांचा उपवर्गीकरणाला पाठिंबा आहे. तर साबळे यांचा विरोध आहे. त्यावरून साबळे यांनी गोरखे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
अमर साबळे म्हणाले, प्रस्थापित व्यवस्थेच्या हिमालयाला मी धडक घेतोय, ही धडक घेतली तर माझा कपाळमोक्ष होईल. रक्तबंबाळ होईल. परंतु हिमालयाला काही होणार नाही हे मला माहिती आहे. परंतु मला हेही माहिती आहे, माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबातून सैनिक निर्माण होतील आणि ते सर्व सैनिक मिळून हा हिमालय उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईतील जाहीर सभेत सांगितले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन आज ज्यांच्या रक्तामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, ते या उपवर्गीकरणाविरोधात रस्त्यावर आलेले भीमसैनिक दिसतात ही एक बाजू आहे.
आणि दुसरी बाजू पिंपरी चिंचवड शहरातील एक आमदार, एका जातीसाठी, एका व्यक्तीसाठी काम करताना दिसतो. तेव्हा या ठिकाणच्या एका जबाबदार नेत्याने त्याच्यावर कठोर टीका केली आणि सर्वसमाजासाठी काम केले पाहिजे एका जातीसाठी काम केले नाही, पाहिजे आहे, अशा पद्धतीचे त्यांनी ठाणकावून सांगितले आहे. तीच व्यक्ती आता मातंग समाजाला वाढीव आरक्षण मिळावे म्हणून उपवर्गीकरणाचा मुद्दा घेऊन, संपूर्ण अनूसूचित जातीमध्ये बुध्दीभेद करताना दिसतोय, अशी टीका साबळे यांनी आमदार गोरखे यांच्यावर केलीय. गर्व कहो हम हिंदू है, हिंदू सारा एक अशा पध्दतीची हिंदूत्वाच्या व्यापक विचारसरणीच्या नरडीला नख लावण्याचे काम हीच व्यक्ती करताना दिसते, असा आरोप साबळे यांनी केलाय.
परंतु मला आनंद वाटतो, हिंदू समाज संघटित व्हावा. हिंदू समाजाचे एेक्य अबाधित राहावे. दलितांचे एेक्य अबाधित रहावे म्हणून गावावातील नवबौध्द तरुण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेरणेने रस्त्यावर उतरताना दिसतोय, तेव्हा हाच हिंदू धर्माच्या एेक्यासाठी नवबौद्ध तरुण रस्त्यावर दिसतोय. त्यालाच म्हणतात धार्मिक सहिष्णूता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि अखेरपर्यंत भारतीय राहिल. ही भारतीयाचे गुणवैशिष्टे घेऊन आजचा नवबौद्ध तरुण या उपवर्गीकरणाचा विरोधात रस्त्यावर आलेले दिसतो. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांनी विश्वास दाखविला होता, तो सार्थ ठरला असे साबळे म्हणाले.