Download App

Manoj Jarange : मोठी बातमी! CM शिंदेंचा मनोज जरांगेंना फोन; जरांगेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचे आंदोलन राज्यभरात चिघळलेले (Manoj Jarange) असतानाच आताच्या घडीला एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन करत त्यांच्याशी चर्चा केली आहे. या दोघांत नेमकी काय चर्चा झाली याची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. आज सकाळी मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये मनोज जरांगे पाटील या चर्चेची माहिती देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आंदोलना दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले करण्यात आले. आजही  सकाळापासून काही ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांना फोन केला. दोघांत जवळपास 24 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, उपोषणामुळे प्रकृती खालावत चालल्याने निदान पाणी तरी घ्या, अशी विनंती आंदोलकांकडून करण्यात आली होती. त्या विनंतीचा मान राखत आता पाणी पिऊन उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.

Maratha Reservation : जामखेड, राहुरी, श्रीगोंद्यात बंदची हाक; पाथर्डीत मोटारसायकल रॅली

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान आरक्षण अर्धवट नको तसेच संपूर्ण राज्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे ही मागणी केली. जरांगे पाटील हे मराठा अभ्यासकांबरोबर चर्चा करून पुन्हा मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचे समजते.

विशेष अधिवेशनाच्या सरकारच्या हालचाली 

राज्यातील या आंदोलनानंतर सरकारी पातळीवरही वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन त्यात मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याच्या मुद्द्यावर सरकारमधील तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. पाऊण तास झालेल्या या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना झाले. या भेटीत दोघांत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Maratha Reservation : प्रकाश सोळंकेंचे बंधू धैर्यशील सोळंकेंच्या बंगल्यातूनही आगीचे लोट

धाराशिवमध्ये संचारबंदी लागू 

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन सोमवारी हिंसक झाले आहे. मराठवाड्यात आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ सुरू केली. बीड जिल्ह्यात दोन आमदारांचे घरे पेटविण्यात आली. बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानला आग लावण्यात आली. त्यानंतर बीड शहरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थानाला आंदोलनकर्त्यांनी आग लावली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयही पेटवून देण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानाबाहेरील पाच ते सहा वाहने जळाली. या परिस्थिती जिल्हा प्रशासनाने येथे तत्काळ संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.

उपोषणाचा आजचा सातवा दिवस 

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. राज्यात हिंसक घटना सुरू झाल्याने आंदोलन चिघळले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानंतर थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर त्यांची आजची पत्रकार परिषद महत्वाची मानली जात आहे. या परिषदेेत जरांगे पाटील काय बोलणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us