CM Eknath Shinde on MLC Election : विधानसभा निवडणुकीआधी विधानपरिषदेची अकरा जागांची निवडणूक (MLC Election 2024) महायुती आणि महाविकास आघाडीसाठी परीक्षा घेणारी ठरली. या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीतील (Elections 2024) पराभवाचा थोडासा का होईना वचपा महायुतीने काढल्याचे (Mahayuti) दिसत आहे. या निवडणुकीत महायुतीने एकूण 9 उमेदवारांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयाचा जोश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या विधानसभेतील भाषणात दिसत होते. एकनाथ शिंदे यांनी विजयी उमेदवारांंचं अभिनंदन करत विरोधकांना खोचक टोले लगावले. येथून पुढील काळात तुमच्या विकेट पाडतच राहणार असा टोला त्यांनी विरोधी महाविकास आघाडीला लगावला.
विधिमंडळ अधिवेशनात आज सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर जोरदार बरसले. विधानपरिषदेतील महायुतीच्या विजयाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका केली.
शिंदे म्हणाले, कसाबच्या बिर्याणीला सपोर्ट करता आणि भारतीय संघाला अकरा कोटींचं बक्षीस दिलं तर तुमच्या पोटात दुखतं. अडीच वर्षात आम्ही काय केलं याचा हिशोब घ्या. महाविकास आघाडीचाही घ्या. दोन वर्षात 1.37 लाख कोटींची परकीय गुंतवणूक मिळाली. मविआ काळात राज्य तिसऱ्या क्रमांकावर होतं ते आम्ही गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर आणलं. कुणाच्या काळात उद्योग पळाले खरं सांगा. दोन महिन्यांतच आमच्यावर उद्योग पळवल्याचे आरोप केले. दोन महिन्यात कोणता उद्योग पळवला जातो ते सांगा असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला.
MLC Election 2024 : महायुतीचे जोरदार कमबॅक; सर्वच्या सर्व उमेदवार विजयी
मविआ सरकारच्या काळात उद्योगपतींच्या घराशेजारी जिलेटीन सापडत होतं. मग राज्यात कसे येणार उद्योग? आमच्या काळात आम्ही उद्योजकांना भेटलो त्यांच्या अडचणी दूर केल्या. दोन वर्षांतला हिशोब आमच्याकडे आहे. सगळी आकडेवारी माझ्याकडे आहे विजयराव (विजय वडेट्टीवार) सगळी आकडेवारी तुम्हालाही पाठवतो असे शिंदे विरोधी पक्षांना उद्देशून म्हणाले.
आम्ही पंधरा हजार गिरणी कामगारांना आम्हाला घरं दिली तुम्ही एक तरी दिली का. धारावीच्या विकासातही तुम्ही आडवे आलात. येथील झोपडीपट्टी धारकांचे आम्ही तेथेच पुनर्वसन करणार हा आमचा शब्द आहे. प्रदुषित पाणी समुद्रात सोडण्याचं काम कुणी केलं? असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांना केला. काँक्रिटचे रस्ते का तुम्ही केले नाहीत. खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आज मुंबई चमचम करत आहे फक्त आपलंच चमकवून चालत नाही असा टोला त्यांनी लगावला.