कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना दरवर्षी (Kolhapur) भेडसावणाऱ्या महापुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने मोठी योजना आखली आहे. महापुराच्या काळात उपलब्ध होणारे तब्बल ३५ ते ४० टीएमसी अतिरिक्त पाणी कालव्याद्वारे उजनी धरणापर्यंत नेऊन, तेथून दुष्काळी तालुके तसेच मराठवाड्याला देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोल्हापुरात केली.
कोल्हापूर शहरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणासह महाराष्ट्र रेझिलिअन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) आणि विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होतं. पुढं बोलताना फडणवीस म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात महापुराचे पाणी जमा होते. या भागात साधारण ८० टीएमसी पाणी उपलब्ध होते. त्यापैकी ३५ ते ४० टीएमसी पाणी कालव्याच्या माध्यमातून उजनी धरणापर्यंत वळवण्याचं नियोजन आहे.
आपले, संदिग्ध, विरोधी; मतदारांची वर्गवारी? SIR मोहिमेवर रोहित पवारांचा सर्वात मोठा दावा
उजनीमार्गे हे पाणी दुष्काळी भाग आणि मराठवाड्यापर्यंत पोहोचविले जाईल. त्यामुळे एकीकडे महापुराचा धोका कमी होण्यास मदत होईल, तर दुसरीकडं पाणीटंचाईने त्रस्त भागाला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महापुराची तीव्रता लक्षात घेऊन या परिसरासाठी महाराष्ट्र रेझिलिअन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जागतिक पातळीवरील सर्वोत्तम प्रकल्पांच्या धर्तीवर या भागातील पूरस्थितीवर उपाययोजना करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात केवळ ७२ तासांचे सरकार अस्तित्वात असताना एमआरडीपी प्रकल्पाची फाइल तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आपल्यासमोर आली होती, अशी आठवणही फडणवीस यांनी यावेळी सांगितली. तत्कालीन सचिव प्रवीण परदेशी यांनी जागतिक बँकेचे प्रतिनिधी या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी आल्याची माहिती दिल्यानंतर आपण आणि अजित पवार यांनी तातडीने या प्रकल्पाबाबत निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
कोल्हापुरातील क्रीडा क्षेत्रालाही चालना देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली. शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली असून, आधुनिक स्टेडियमच्या उभारणीसाठी बीसीसीआयकडे राज्य सरकारच्या वतीने विनंती करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. कोल्हापूरच्या फुटबॉल संस्कृतीचा विचार करून फुटबॉलप्रेमींसाठी आवश्यक क्रीडा सुविधा निर्माण करण्यावरही सरकारचा भर राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
