Ajit Pawar on ST bus fare hike : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. एसटीच्या जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन चांगली सुविधा ग्रामीण आणि शहरी भागात देण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे भाडेवाढ करणे आवश्यक असून चर्चा सुरू आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.
विशेष म्हणजे राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत परिवहन विभागाचे मुख्य सचिव, राज्य परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष, अतिरिक्त पोलीस महासंचालक, परिवहन आयुक्त उपस्थित होते. या बैठकीत एसटीच्या तिकीट दरांत 14.95 टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. असे असताना अजित पवार यांनी मात्र वेगळेच वक्तव्य केल्याने भाडेवाढ खरंच झाली किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे.
प्रवाशांना मोठा ‘धक्का’ ST बसची भाडेवाढ जाहीर, जाणून घ्या नवीन दर
अजित पवार पुढे म्हणाले, मुख्यमंत्री आज पहाटेच परदेशातून आलेले आहेत. त्यांच्या कानावर घालूनच अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विचारुनच पुढील निर्णय होईल. एसटी महामंडळ व्यवस्थित चाललं पाहिजे आणि जनतेचा त्रास कमी झाला पाहिजे यासाठी मध्यममार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून एसटीच्या भाडेवाढी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये 14.95 टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दिनांक 25 जानेवारी 2025 (२४ जानेवारी 2025 च्या मध्यरात्रीनंतर) पासून अंमलात येईल असे निर्देश राज्य परिवहन प्राधिकरणाने दिले आहेत.
वाहनांसाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसी, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे भाडेवाढ सुत्रानुसार महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाच्या 276 व्या बैठकीत विचारार्थ सादर करण्यात आला. मागील भाडेवाढ दिनांक 26 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आली होती.