Rajya Sabha Election : निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या 37 जागांपैकी 7 जागांसाठी महाराष्ट्रात देखील निवडणूक होणार आहे. आकडेवारनुसार 7 पैकी 6 जागांवर महायुती बाजी मारणार आहे. तर एक जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे. मात्र या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या जागेसाठी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून देखील दावा करण्यात येत असल्याचे ही जागा कुणाला मिळणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे यासंदर्भात काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील (NCPSP) नेत्यांची बैठक पार पडली असून बैठकीत काँग्रेसने या जागेसाठी दावा केला असल्याची माहिती समोर येत आहे. बैठकीत काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) , सतेज पाटील (Satej Patil) आणि इतर नेते उपस्थित होते तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) , जयंत पाटीलसह (Jayant Patil) इतर नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीत तोडगा निघालेला नसल्याची देखील माहिती समोर आली आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत ही जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे असा आग्रह काँग्रेसकडून धरण्याचे सांगितले जात आहे. 2022 साली महाविकास आघाडीच्या चार जागांपैकी दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले होत्या. त्यामुळे आता ही जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे असं या बैठकीत काँग्रेसकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे ही जागा शरद पवार यांच्यासाठी सोडण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र शरद पवारांनी आता पर्यंत राज्यसभेवर जायची स्वत: हुन इच्छा व्यक्त केली नाही असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं. यावर उत्तर देत पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी ती इच्छा व्यक्त केली असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले.
पाकिस्तान- अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरू; पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची घोषणा-
शरद पवारांसाठी काँग्रेस जागा सोडणार?
जर शरद पवारांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छ व्यक्त केली तर काँग्रेस जागेसाठी आग्रह सोडणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे या जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून शरद पवार यांच्या नावाला सहमती देण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्यसभेसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून संध्याकाळी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
