मुंबई : राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्यातील विरोधी पक्षनेते (Leader of Opposition) काँग्रेसकडे (Congress) जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसही विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक असून दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडी लक्षात घेता येत्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेतेपद नेमकं कोणत्या पक्षाकडे जाणार याचा फैसला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्यापूर्वीच काँग्रेसचे भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी दंड थोपटले असून विरोधी पक्ष नेतेपदावर आपली वर्णी लागावी यासाठी त्यांनी थेट दिल्लीत फिल्डिंग लावली आहे. (MLA Sangram Thopete has written a letter to Congress National President Mallikarjun Kharge, requesting him to consider his name for the post of Leader of the Opposition.)
मिळालेल्या माहितीनुसार आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले असून, विरोधी पक्षनेतेपदासाठी आपल्या नावाचा विचार करावा, अशी विनंती केली आहे. या पत्रात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिल्यास काय फायदा होऊ शकतो याबाबतही माहिती दिली आहे. सोमवारी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर या पत्राला महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले किंवा पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात अशा अन्य ज्येष्ठ नेते डावलून थेट राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदासाठी माझ्या नावाचा विचार झाला होता. मात्र तेव्हा अजित पवार यांनी माझ्या नावाला विरोध केला होता. आता अजित पवार हे भाजपसोबत गेले आहेत. सोबतच पश्चिम महाराष्ट्रातील आणि त्यातही पुणे जिल्ह्यातील राजकारण लक्षात घेऊन मी या संधीचा लाभ घेऊ शकतो. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात पक्षाच्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यासाठी काँग्रेस पक्षाला प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर आणू शकतो.
काही महिन्यांपूर्वी पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. तिथे माझ्याकडे मुख्य पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी होती. ती जागा आपण निवडून आणली आहे. तसेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्येही मी पर्यवेक्षक होतो. जर काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये भाजप युतीविरोधात लढायचं असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रश्नांवर तोडगा काढावा लागेल. त्यासाठी आपला अनुभव महत्त्वपूर्ण ठरेल, असेही थोपटे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना सांगितलं आहे.
दरम्यान, लेट्सअप मराठीशी संवाद साधताना संग्राम थोपटे यांनी असे कोणतेही पत्र पाठवले असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. हे सगळे निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतात. मी तीन टर्मचा आमदार आहे, मी कशासाठी माझा बायोडाटा पाठवू. मी विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक आहे किंवा नाही, या पुढच्या गोष्टी आहेत. मात्र तसे कोणतेही पत्र मी पक्ष श्रेष्ठींना पाठविलेले नाही.