Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून माध्यमांशी बोलताना त्यांनी कुंभमेळ्यासाठी सरकारने गुजरातचे कंत्राटदार आणले असल्याचा आरोप केला आहे. राज ठाकरेंच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं आहे असं माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले.
माध्यमांशी बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, या कुंभमेळ्यासाठी अनेक कंत्राटदार गुजरातमधून (Gujarat) आणले असं समजलं आहे. महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मलेच नाहीत का? वरुन जे आदेश येणार तसे कुंभमेळे (Nashik Kumbh Mela) करायचे. महाराष्ट्रातील सगळ्या गोष्टी अशाच हाताळल्या जात असतील तर यांना लखलाभ असो असं राज ठाकरे म्हणाले. त्यावेळेला आम्ही इतकं सुंदर नाशिक (Nashik) केलं. त्याची दुर्दशा बघून वाईट वाटतं. बोटॅनिकल गार्डन असेल किंवा बाळासाहेबांच्या नावाने केलेलं म्युझियम असेल. दुसऱ्याने केलं आहे म्हणून त्याची वाट लावायची. स्मार्ट सिटीची घोषणा केली होती. त्याचं काय झालं? कुठे गेली ती स्मार्ट सिटी? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, देशाच्या कुठल्याही शहरात तुम्हाला काही दिसत नाही. सगळं शहर बरबाद होत आहे. ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जात आहेत. त्या फ्रॉड पद्धतीने हाताळल्या जात आहेत आणि हे लोकांना देखील माहिती आहे. परंतु जे मतदान करत आहेत, त्यांनी देखील या गोष्टीचा विचार केला पाहिजे असेही यावेळी राज ठाकरे म्हणाले.
तर या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी नीट पेपर फुटी प्रकरणावरुन (NEET Paper Leak Case) केंद्र सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल करत सर्व पेपर कोचिंग क्लासेसमधूनच फुटले सरकारने त्यावर लक्ष दिले पाहिजे असं म्हटलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, दहावी पास झाल्यावर विद्यार्थी कोणत्या कॉलेजला जाणार, हे आता कोचिंग क्लासेस ठरवणार का? हा आता मोठा धंदा झाला आहे.
अॅक्शन थ्रिलर ब्लूफ्लायमध्ये झळकणार प्रियंका चोप्रा
आजवरचे NEET चे सर्व पेपर कोचिंग क्लासेसमधूनच फुटले आहेत. त्यामुळे सरकारने आधी या क्लासेसवर लक्ष दिले पाहिजे. कॉलेजची फी 20 हजार आणि क्लासची फी 1 लाख रुपये, एवढी मोठी तफावत असताना विद्यार्थ्यांनी चिडायचे नाही तर काय करायचे?
