अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे मैदानात; महायुतीच्या विजयाचा निर्धार, बंडखोरांमुळे पेच कायम

मी धाडस केले नसते, तर महाराष्ट्र 15 ते 20 वर्षे मागे गेला असता, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

Untitled Design   2026 10 18T171521.172

Untitled Design 2026 10 18T171521.172

DCM Eknath Shinde’s big claim : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, पाच मतदारसंघांमध्ये निवडणुकीची चुरस वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेते आणि मंत्री प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पुणे आणि अमरावती येथे शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत असून, महायुतीने पुण्यातील जागा भाजपकडे तर अमरावती शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी शिवसेनेचे किरण सरनाईक यांना दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी अमरावतीचा दौरा केला.

अमरावती शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रीती रेवने यांनी उमेदवारी मागे घेतल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. महायुती म्हणून निवडणूक जिंकण्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिंदे यांनी शिवसेनेतील बंडाची आठवण करून देत आपल्या निर्णयाचे समर्थन केले. मी धाडस केले नसते, तर महाराष्ट्र 15 ते 20 वर्षे मागे गेला असता, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. तो ऐतिहासिक निर्णय होता आणि त्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार पडले, असा दावा देखील त्यांनी केला.

राणा दाम्पत्याने कठीण परिस्थितीत देखील माघार घेतली नाही. त्याचप्रमाणे आपण देखील घाबरणार नाही, असं वक्तव्य करत शिंदे यांनी राजकीय भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. शिक्षकांच्या विविध मागण्यांवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. मी दिलेला शब्द पाळणारा आहे. एकदा कमिटमेंट दिली, तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, असे ते म्हणाले.

‘हिंदुत्व मुर्दाबाद’च्या घोषणांवरून वाद, कॉकरोच जनता पार्टीच्या 300 हून अधिक अज्ञात समर्थकांविरोधात गुन्हा

शिक्षक हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक असल्याचे सांगत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील, असे आश्वासन त्यांनी दिले. यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असं देखील शिंदे यांनी नमूद केले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत शिंदे यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत देखील भाष्य केले. दुष्काळ निवारणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं. तसेच शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये देण्यात येणार असून, त्यांनतर इतर सवलती देखील दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची अमरावतीतील एम. डब्लू मंगल कार्यालयात सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या निवडणुकीत महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान कायम आहे. भाजपने बंडखोरांविरोधात कारवाई केली असली, तरी शिवसेनेच्या शिंदे गटातील श्रीकांत देशपांडे अद्याप निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारासमोर मतविभाजनाचे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघातील या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले असून, महायुती आपला उमेदवार विजयी करण्यासाठी कितपत यशस्वी ठरते, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

Exit mobile version