Delegation Meets Governor Regarding : संतोष देशमुख यांच्या (Santosh Deshmukh) हत्येप्रकरणी तपासाची सद्यस्थिती आणि यामध्ये नाव येत असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपाल महोदयांनी घ्यावा, तसंच, इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्यपालांची भेट घेतली. त्यामध्ये मागणी
धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, अवादा कंपनीकडे मागितली 3 कोटींची खंडणी; सुरेश धस यांचे गंभीर आरोप
या हत्येप्रकरणी गेल्या काही दिवसांत राज्यभरात अनेक आंदोलनं देखील होताना पहायला मिळाली. या हत्येचा आरोप असलेल्या 7 आरोपींपैकी सहा जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. मात्र एक आरोपी अद्यापही फरार आहे. विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनाही आता सीआयडीने ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र या सर्व हत्याप्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्यामागे असलेले त्यांचे नेते धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्षात सहभाग आहे, असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांना भेटले आहेत.
भाजप आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. आवादा कंपनीकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती. ती खंडणी वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकाने मागितली होती, त्याच खंडणीच्या संदर्भातच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. वाल्मिक कराड व त्याच्या आकावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी सातत्याने मागणी सुरेश धस व इतर नेत्यांकडून केली जात आहे. याच सर्व मुद्यांसदर्भात आज त्यांनी राज्यपालांसोबत चर्चा केली आहे.
कोण कोण होते शिष्टमंडळात
भाजपचे सुरेश धस, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे भोसले, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर तसेच जितेंद्र आव्हाड, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचा त्यात समावेश होता.