Download App

अजितदादांच्या गटाचे भवितव्य जयंत पाटलांच्या हाती… म्हणूनच सुरुय मनधरणी!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकत्र येणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. यासाठी या दोघांमध्ये यापूर्वी चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत होते. याशिवाय जयंत पाटील यांनी नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पुणे दौऱ्यात भेट घेतल्याच्याही बातम्या आल्या होत्या. त्यामुळे अजितदादा करत असलेली जयंत पाटील यांची मनधरणी यशस्वी होणार का हे पाहणं आगामी काळात महत्वाचं ठरणार आहे. एका बाजूला या चर्चा सुरु असताना दुसऱ्या बाजूला ही मनधरणी नेमकी का सुरु आहे असा सवाल सर्वत्र विचारला जात होता. (Deputy Chief Minister Ajit Pawar and Nationalist Congress Party (Sharad Pawar Group) State President Jayant Patil will come together)

आता मात्र या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून अजित पवार यांच्या गटाचे भवितव्यच जयंत पाटील यांच्या हातात आहे. त्यामुळेच त्यांची मनधरणी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी याबाबतची शक्यता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असून त्यांनी विधिमंडळ गटनेते म्हणून जयंत पाटील यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांचा आदेश महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत त्यांना आपल्याकडे वळविणे ही व्यूहरचना असू शकते.

Letsupp Special : अजितदादासोबत आले तरी, जयंत पाटलांसाठी भाजपचा आटापिटा का?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधिमंडळात फूट पडली आहे. त्यामुळे त्यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. मात्र विधिमंडळात अधिकृत प्रतोद नियुक्त करण्याचा अधिकार हा राजकीय पक्षाच्या प्रमुखाला असतो. घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार, हा अधिकार त्या पक्षाच्या अध्यक्षाला असतो. राजकीय सत्तासंघर्षांच्या निकालातही ही बाब सर्वोच्च न्यायालयाने उघड केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा अधिकृत पक्ष, ज्याची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली आहे, त्यामुळे जयंत पाटलांचा आदेश किंवा व्हीप हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे प्रयत्न सुरु असावेत असे मत निकम यांनी व्यक्त केले.

जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार? वडेट्टीवारांच्या उत्तराने ‘मविआ’ला मिळालं बळ

जयंत पाटील आल्यास त्यांचं स्वागतच करणार : भाजपचे मंत्री विखे पाटील यांची भूमिका

दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत जयंत पाटील आल्यास भाजपही त्यांचं स्वागत करेल अशी भूमिका भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे. ते म्हणाले, जयंत पाटील यांनी स्वतःच यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना स्वतःलाच आता त्या पक्षात एकटा पडलोय असे वाटत आहे. राजकारणात काहीही घडू शकतं त्यामुळे निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. अजितदादा आले त्यांचं स्वागत केलं. अन्य आमदार आले त्यांचंही स्वागत केलं. त्यामुळे जयंत पाटील यांच्याबाबत वेगळी भूमिका असण्याचे कारण नाही. ते जर आले तर त्यांचं स्वागतच आहे, असे विखे म्हणाले.

follow us