Letsupp Special : अजितदादासोबत आले तरी, जयंत पाटलांसाठी भाजपचा आटापिटा का?

Letsupp Special : अजितदादासोबत आले तरी, जयंत पाटलांसाठी भाजपचा आटापिटा का?

– ऋषिकेश नळगुणे :

जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार, जयंत पाटील भाजपच्या संपर्कात, जयंत पाटील अजितदादांसोबत जाणार अशा बातम्या मागील काही दिवसांपासून आपण सातत्याने ऐकत आहोत. या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येण्यापूर्वीच काल बातमी आली की जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भाजपकडूनही कोणती प्रतिक्रिया न आल्याने या बातमीला हवा मिळाली. मात्र जयंत पाटील यांनीच पुढे येत अखेर या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले. (Why Jayant Patil wants BJP along with Ajit Pawar and more than 35 MLAs)

काही दिवसांपूर्वी खुद्द भाजपकडूनच जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडणार त्याची 10 कारण दिली होती. बंडानंतर अजित पवार यांनीही त्यांच्यावर थेटपणे टीका करणे टाळले होते. या सगळ्या घडामोडी लक्षात घेता भाजपला आणि अजित पवार यांनाही जयंत पाटील सोबत हवे असल्याचे दिसून येते. मात्र अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे आणि 35 हून अधिक आमदार सोबत घेऊनही जयंत पाटील भाजपला सोबत का हवेत? राष्ट्रवादीत असताना अजित पवार आणि जयंत पाटील यांचे फारसे जमत नव्हते. मात्र तरीही आता अजित पवार यांना जयंत पाटील का हवे आहेत? असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत.

भाजपला अन् अजित पवार यांना जयंत पाटील सोबत का हवेत?

सांगली जिल्हा भाजपमय :

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, विधान सभा आणि लोकसभांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये सांगली जिल्हा भाजपमय करण्यासाठी जयंत पाटील यांची साथ आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा-इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगांव, तासगांव-कवठे महाकाळ अशा विधानसभा मतदारसंघांवर त्यांचा प्रभाव आहे. याशिवाय सांगलीतील सांगली आणि हातकणंगले अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील निकालावर पाटील परिणाम करु शकतात.

याशिवाय गतवेळी सांगली महापालिका जयंत पाटील यांच्या नेतृ्त्वात राष्ट्रवादीने जिंकली होती. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीतही जयंत पाटील भाजपसाठी महत्वाचे ठरु शकतात. याशिवाय सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेवरील जागेवरही पाटील यांचा भाजपला फायदा होऊ शकतो. सांगली जिल्हा बँकेवरही सध्या जयंत पाटील यांच्याच गटाची सत्ता आहे. जयंत पाटील यांच्या गटातील शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक हे विद्यमान अध्यक्ष आहेत.

आणखी काही आमदार अजित पवारांच्या गटात येऊ शकतात :

सध्या अजित पवार आणि शरद पवार यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत याचा अधिकृत आकडा उघड झालेला नाही. मात्र अजित पवार यांच्यासोबत 35 हून अधिक आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात सांगली जिल्ह्यातील एकही आमदार सोबत नाही. सांगतीतील जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील आणि अरुण लाड हे आमदार शरद पवार यांच्याच गटात आहेत. मात्र जयंत पाटील अजितदादांसोबत आल्यास मानसिंगराव नाईक, प्राजक्त तनपुरे आणि जयंत पाटलांना मानणारे आणखी काही आमदार अजित पवार यांच्या गटात येऊ शकतात.

शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीत 2 नंबरचा नेता नाही :

सध्या जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे वगळता शरद पवार यांच्याकडे पहिल्या फळीतील मास बेस एकही नेता नाही. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरेंसारखे पहिल्या फळीतील सर्व नेते दुसऱ्य गटात गेले आहेत. जयंत पाटील हेही अजित पवार यांच्यासोबत आल्यास शरद पवार यांच्यानंतरचा राष्ट्रवादीत दोन नंबरचा नेता आणि चेहरा कोण? आगामी काळातील निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी शरद पवारांसोबत कोण? असे प्रश्न उभे राहतात. त्यामुळे भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवार यांच्यावरही दबाव वाढू शकतो.

अजित पवार यांच्या बंडाला नैतिकता :

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी फोडल्याची टीका होत आहे. या वयात शरद पवार यांना लढण्यासाठी मैदानात उतरावं लागलं, त्यामुळे सध्या सहानुभीत शरद पवार यांच्याबाजूने आहे. मात्र अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी अनेक वेगवेगळी कारण सांगितली आहेत. विकासासाठी,विकासकामांसाठी लागणाऱ्या निधींसाठी, मतदारसंघातील लोकांच्या कामासाठी भाजपसोबत सत्तेत गेलो असे दावे केला जात आहेत. अशात जयंत पाटीलही अजित पवार यांच्यासोबत आल्यास त्यांच्या बंडातील नैतिकतेला अधिक बळ मिळू शकते.

निवडणूक आयोगातील लढाईला अधिक बळ :

निवडणूक आयोगात सध्या राष्ट्रवादीची याचिका प्रलंबित आहे. आगामी काळात अजित पवार यांच्याबाजूने निकाल हवा अल्यास शिवसेनेच्या याचिकेप्रमाणेच निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने किती आमदार आणि खासदार आहेत, याचा विचार केला जाऊ शकतो. अशात जयंत पाटील यांच्या येण्याने बहुतांश आमदार अजित पवार यांच्या बाजूने असल्याच सिद्ध होऊ शकतं. याशिवाय जयंत पाटील मागील 5 वर्षांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. या काळात त्यांनी स्थानिक पातळीवर त्यांना मानणारी एक फळी उभी केली आहे. ही फळीही पाटील यांच्यासोबत अजित पवार यांच्या गटात जाऊ शकते. त्यामुळे अजित पवार यांच्या लढाईला अधिक बळ मिळू शकते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube