Download App

‘राज्यातील परिस्थिती गंभीर होत आहे’ : अजित पवारांनी दिले दुष्काळाचे संकेत; शासन लागले तयारीला

Image Credit: letsupp

परभणी : महाराष्ट्रात अजून म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. आपल्या सगळ्यांनाच पावसाची प्रतिक्षा आहे. मात्र परिस्थिती गंभीर होत आहे, असे म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी काळातील दुष्काळाचे संकेत दिले. ते परभणी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह परभणी जिल्ह्यातील आमदार आणि अधिकारी उपस्थित होते. (Deputy Chief Minister Ajit Pawar hinted at drought in the coming period)

यावेळी अजित पवार म्हणाले, सध्या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर जरा वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यात अजून म्हणावा असा चांगला पाऊस पडलेला नाही.  चांगल्या पावसाची आपल्या सगळ्यांना प्रतिक्षा आहे. मात्र परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला त्याच्या झळा बसू लागल्या आहे. या परिस्थितीमध्ये आपण महायुतीचा सरकार सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकतीने उभा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे.

खळबळजनक! भाजप खासदाराच्या घरी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला 10 वर्षीय मुलाचा मृतदेह

स्वतः मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यामध्ये मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मदत, पुनर्वसन मंत्री उपस्थित होते. याशिवाय सगळे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे उपस्थित होते. आगामी परिस्थितीबाबत काय काय पावलं आत्ताच उचलली पाहिजे, याचा आढावा घेतला. अजून काही पावसाचे दिवस बाकी आहेत. गणपती, दहीहंडीचे, नवरात्र, दसरा, दिवाळीचे दिवस आहेत. या काळामध्ये काही भागांमध्ये पाऊस पडतो. त्यामुळे अद्याप आपण आशावादी आहोत.

परभणीमध्ये जून ते सप्टेंबर कालावधीमध्ये 761 मिलिमीटर पाऊस पडतो. त्यानुसार 24 ऑगस्टपर्यंत सरासरीच्या 60% पाऊस पडणं अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यात 43% पाऊस पडलेला आहे. त्यातच दोन पावसांमधील अंतर वाढलेले आहे, पीक पाण्याला आलेली आहेत. जिल्ह्यामध्ये आपला येलदरी धरण आहे, सध्या फक्त 60% भरले आहे. गेल्यावर्षी याच सुमारास 90% भरलं होतं. निम्नदुधना 27% भरलं आहे. गेल्यावर्षी 69 टक्के होतं. तारुण गवार प्रकल्प 53% आहे. गेल्यावर्षी 65 टक्के होता. त्याचप्रमाणे इतर मध्यम प्रकल्पामध्ये मिळून 15 टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे.

‘BRS’ चा भाजपला दणका! सोलापुरात पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत धरली हैदराबादची वाट

या सर्वच बाबींचा विचार करता, मी तुम्हाला घाबरत नाही परंतु परिस्थिती गंभीर होऊ पाहत आहे. जिल्ह्यातून प्रामुख्याने पूर्णा, गोदावरी, दुधना या नद्या वाहतात. त्यांच्या पाणी पातळीवर फार देखील बराच फरक पडलेला आहे. काही ठिकाणी गोदावरी कोरडी पडल्यासारखी पाहायला मिळाली. या सर्वच परिस्थितीचा गांभीर्य ओळखून संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

स्थानिक परिस्थितीनुसार त्या-त्या धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन पाण्याचं काटकसरीतच नियोजन केलं जातं आहे. ग्रामीण भागात विहिरी, तलाव उपलब्ध पाहून पाण्याचा नियोजन करणे गरजेचे आहे. जनावरांना हिरवा चारा आणि  माणसांना प्यायचं पाणी याचाही नियोजन करायला सांगितलेलं आहे. वन विभागाला गवताचे लिलाव करू नका, गवत राखीव ठेवून त्यांच्या पेंड्या करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जिल्हा नियोजनामधून जिथे दुबार पेरणी करावी लागते तिथं बियाण्यांच्यासाठी निधी देण्याचा सुचना दिलेल्या आहेत.

नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. उर्वरित संपूर्ण मराठवाड्यात मात्र पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे खरीप पीकं अडचणी आहेत, अशा संकटात आलेल्या शेतकरी बांधवाला मदत करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे, असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Tags

follow us

वेब स्टोरीज