Deputy Chief Minister Ajit Pawar’s direct accusation against BJP : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील सत्ताधारी पक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार शब्दयुद्ध रंगले आहे. अजित पवारांनी भाजपवर थेट टीका केल्यानंतर भाजपच्या मंत्र्यांकडूनही पलटवार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला टोला लगावला, त्यानंतर थेट टीकेचा सूर आळवला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा खटला अद्याप न्यायालयात सुरू असल्याचे सांगत एकप्रकारे इशाराच दिला होता.
या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन प्रकल्पातील कथित घोटाळ्याचा गंभीर आरोप करत भाजपला थेट आव्हान दिले आहे. प्रचारसभेदरम्यान बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘जर मी ती फाईल बाहेर काढली असती, तर राज्यात हाहाकार माजला असता.’ अजित पवारांनी तब्बल 25 वर्षांपूर्वीचा दाखला देत सांगितले की, 1999 साली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर जलसंपदा खाते त्यांच्या ताब्यात होते. त्यावेळी पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल त्यांच्या टेबलवर आली. या प्रकल्पाची किंमत 310 कोटी रुपये दाखवण्यात आली होती.
भ्रष्ट माणसांच्या हातात…, प्रचार संपताच अभिनेत्री तेजस्विनी पंडितची पोस्ट व्हायरल
मात्र, अधिक चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाची मूळ किंमत केवळ 200 कोटी रुपये असल्याची कबुली दिली, असा दावा अजित पवारांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, 1995 ते 1999 या काळात सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप सरकारच्या काळात ही किंमत वाढवण्यात आली होती. एवढेच नव्हे, तर ‘100 कोटी रुपये पार्टी फंडासाठी मागण्यात आले होते आणि अधिकाऱ्यांनीही त्यात स्वतःचे 10 कोटी रुपये वाढवले,’ असा धक्कादायक आरोप अजित पवारांनी केला.
‘ती फाईल आजही माझ्याकडे आहे. जर ती मी काढली असती, तर मोठा राजकीय भूकंप झाला असता,’ असे म्हणत अजित पवारांनी भाजपवर गंभीर आरोपांची तोफ डागली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, विशेष बाब म्हणजे 1999 पूर्वीच्या शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये भाजपचे दिवंगत नेते महादेवराव शिवणकर हे जलसंपदा मंत्री होते. त्यामुळे हा कथित प्रकार त्यांच्याच मंत्रिपदाच्या काळातील असल्याचे समजते. आता अजित पवारांच्या या आरोपांवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, आणि हे आरोप-प्रत्यारोप महापालिका निवडणुकांच्या प्रचारात किती रंगत आणतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
