‘रात्रीस खेळ चाले’, महानगरपालिकांच्या प्रचार तोफा थंडावल्या; वाचा खास स्टोरी

प्रत्येक निवडणुकीप्रमाणे महापालिकेसाठी देखील जातीय समीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. हे लक्षात घेऊनच प्रमुख राजकीय पक्षांनी पॅनल तयार केले.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 13T204021.150

राज्यातील 29 महापालिकेचा प्रचार गेली ११ दिवसांपासून राज्यभरात जोरदार सुरू होता. (Election) यामध्ये धडाडणाऱ्या प्रचारतोफा आज मंगळवार (दि. 13 जानेवारी)रोजी सायंकाळी थंडावल्या. या निवडणुकीमध्ये तिरंगी व चौरंगी सामना असून काही प्रभागांमध्ये काट्याची लढत होत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील ३६ तासांत गुप्त मोर्चेबांधणीवर जोर राहील. रात्रीस खेळ चालणार असून भेटीगाठीतून समीकरण जुळवण्याची धडपड सुरू झाली आहे.

यामध्ये अकोला महापालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर होत आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांसह इच्छुकांकडून जोरदार तयारी केली. महापालिकेच्या २० प्रभागांतील ८० जागांसाठी ४६९ उमेदवार मैदानात आहेत. या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र, शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढले. शिवसेना ठाकरे गट सुद्धा स्वबळावर, तर काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटात आघाडी होती. वंचित आघाडी व ‘एआयएमआयएम’ने उमेदवार देत निवडणुकीतील रंगत वाढवली.

ब्रेकिंग : 12 झेडपी अन् 125 पंचायत समित्यांचं बिगुल वाजलं; 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला निकाल

प्रत्येक निवडणुकीप्रमाणे महापालिकेसाठी देखील जातीय समीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. हे लक्षात घेऊनच प्रमुख राजकीय पक्षांनी पॅनल तयार केले. मात्र, ज्या समाजाला उमेदवारीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व दिले, तो समाजसोबत राहील का? याची शाश्वती पक्षांना नाही. त्यामुळे विविध गठ्ठा मतदार असलेल्या समाजातील पदाधिकारी, गणमान्य नागरिकांच्या भेटीगाठीतून जनाधार भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यासाठी राजकीय नेते, उमेदवारांची धावाधाव सुरू असून त्यांना कितपत यश येते, हे लवकरच स्पष्ट होईल.

जातीय समीकरण लक्षात घेऊन पक्षांनी उमेदवारांचे पॅनल तयार केले. या माध्यमातून विविध समाजाला प्रतिनिधित्व देऊन गठ्ठा मतदान पारड्यात पाडून घेण्याची पक्षांची रणनीती आहे. आपल्या समाजाच्या उमेदवाराला झुकते माप देणारा मतदार संपूर्ण पॅनलाच मतदान करेल, याची कुठलीही खात्री नाही. विरोधातील पॅनलमध्ये त्याच समाजाचा उमेदवार दुसऱ्या जागेवर असल्यास त्याला मतदान होऊ शकते. या ‘क्रॉस व्होटिंग’चा धोका राजकीय पक्षांपुढे आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांनी ‘पॅनल’चा प्रचार सोडून ‘इतरांचे जाऊ द्या, माझ्या एकट्याकडे लक्ष ठेवा,’ अशी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली.

अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काही ठिकाणी तुल्यबळ सामना आहे. हिंदुत्ववादीसह मुस्लीम बहुल भागात देखील मतविभाजन हा कळीचा मुद्दा राहील. हिंदुत्ववादी मतदानांची फाटाफूट टाळण्याचे पुरेपूर प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. पक्षाची मतपेढी असून ती कायम सोबत असते. इतर उमेदवारांमुळे विभाजन होणार नाही, असा दावा भाजप नेत्यांनी केला. मुस्लीम बहुल भागात काँग्रेसपुढे ‘एआयएमआयएम’ने मोठे आव्हान निर्माण केले. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

follow us