Deputy Chief Minister Sunetra Pawar in action mode on the Zirwal case : राज्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडवणारे प्रकरण म्हणजे अन्न व औषध प्रशासन खात्याच्या मंत्रालयातील लाचखोरीचा प्रकार. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या कार्यालयातील लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्यामुळे हे प्रकरण थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचले आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून संबंधित खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका औषध विक्रेत्याचा निलंबित परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. यापैकी 35 हजार रुपये स्वीकारताना लिपिक राजेंद्र ढेरंग हे ACB च्या जाळ्यात अडकले. मंत्रालयासारख्या सत्ताकेंद्रातच लाचखोरीचा प्रकार उघड झाल्यामुळे प्रशासन आणि राजकारण दोन्ही स्तरांवर एकच खळबळ उडाली.
या घटनेचा फटका थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसताना दिसत आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून पक्षावर जोरदार टीका सुरू केली आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे. विशेष म्हणजे, पक्षातील फारसे वरिष्ठ नेते त्यांच्या समर्थनासाठी उघडपणे पुढे आले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अनुपस्थितीत पक्ष पहिल्यांदाच मोठ्या राजकीय कोंडीत सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वर्ल्डकपमध्ये भारत-पाक पुन्हा भिडणार; सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः पुढाकार घेतल्याची माहिती आहे. प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी आणि पुढील राजकीय भूमिका ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक सोमवारी सायंकाळी सहा वाजता बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नरहरी झिरवळ प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला जाणार असून पुढे कोणती भूमिका घ्यायची यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
याच बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भातील राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीबाबतही चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पुढील पंधरा दिवसांत या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकंदरित, मंत्रालयातील लाचखोरीच्या या घटनेमुळे केवळ प्रशासकीय प्रश्नच निर्माण झालेले नाहीत, तर त्याचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. आता कोअर कमिटीच्या बैठकीत काय निर्णय होतो आणि मंत्री नरहरी झिरवळ यांच्याबाबत पक्ष कोणती भूमिका घेतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
