DFO Shivkumar acquitted in case of Forest Range Officer Deepali Chavan’s death : अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वनपरिक्षेत्र महिला अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या दीपाली चव्हाण यांनी पाच वर्षांपूर्वी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. तत्कालीन DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये केला होता. या प्रकरणानंतर विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला असून, विनोद शिवकुमार यांच्याविरोधातील दोषारोपपत्र रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
चार मित्रांचं बिनधास्त जगणं आणि ‘मांजर’ची धमाल! टीझरने वाढवली उत्सुकता
पोलिसांच्या तपासात शिवकुमार यांनी दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे किंवा त्यासाठी चिथावणी दिल्याचे ठोस पुरावे आढळले नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच मृत्यूच्या आसपासच्या काळातील अशा प्रकारचा थेट पुरावाही तपासातून समोर आला नसल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी विनोद शिवकुमार यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मात्र, हे दोषारोपपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी करत शिवकुमार यांनी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला.
दोषीला कठोर शिक्षा द्या; जुन्नर तालुक्यातील चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर आमदार तांबेंची मागणी
विनोद शिवकुमार यांच्याकडून दीपाली चव्हाण यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी किंवा त्यासाठी चिथावणी देणारी ठोस कृती झाल्याचे दिसत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.एखाद्या कर्मचाऱ्याला कामाच्या संदर्भात फटकारणे, कारणे दाखवा नोटीस बजावणे, प्रशासकीय सूचना देणे किंवा शिस्तभंगाची कारवाई करणे, या बाबी केवळ त्यांच्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरू शकत नाहीत, असेही न्यायालयाने नमूद केले.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या निर्णयानंतर सुमारे साडेपाच वर्षांनी विनोद शिवकुमार यांना या प्रकरणातून दिलासा मिळाला आहे.
दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये काय होतं?
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या कथित सुसाईड नोटमध्ये विनोद शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “ऑक्टोबर 2020 मध्ये आम्ही आमझरी दौऱ्यावर असताना गर्भवती असल्यामुळे मला ट्रेक करता येत नव्हता. याबाबत मी पियूषा मॅडम यांना माहिती दिली आणि घरी निघून गेले. त्यानंतर सलग तीन दिवस मला भाकूरमधील कच्च्या रस्त्यावर फिरवण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. मात्र, त्यानंतरही मला सुट्टी देण्यात आली नाही,” असा उल्लेख त्यांनी नोटमध्ये केल्याचे समोर आले होते.माझे सासर अमरावतीत असूनही महिन्यातून एकदाही घरी जाता येत नाही. रात्री-अपरात्री कुठेही भेटण्यासाठी बोलावले जाते आणि अश्लील भाषेत बोलले जाते, असेही त्यांनी नमूद केले होते.
यापूर्वीही याबाबत तक्रार केली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्याचीच बाजू घेतली जाईल, अशी भीती असल्याने आपण स्वतःच्या बदलीचा विचार करत असल्याचे त्यांनी लिहिले होते.“मेळघाट ही अशी दलदल आहे, जिथे आम्ही आमच्या मर्जीने येऊ शकतो; मात्र तुमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. याच दलदलीत मी अडकत चालले आहे,” असा उल्लेखही सुसाईड नोटमध्ये करण्यात आला होता.
स्टाफ आणि गावकऱ्यांसमोर शिवीगाळ केल्याचा आरोप
आपल्या स्टाफसमोर, गावकऱ्यांसमोर आणि मजुरांसमोर शिवीगाळ केली जात असल्याचा आरोपही दीपाली चव्हाण यांनी केला होता. रात्री अनेक वेळा बोलावून आपल्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले होते.आपल्या मर्जीप्रमाणे वागले नाही म्हणून आपल्याला शिक्षा दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच रोखलेले वेतन तातडीने देण्यात यावे आणि आपल्या मृत्यूनंतर मिळणारे आर्थिक लाभ आईला देण्यात यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली होती.
Haiwaan : सैफ अली खानचा ‘हैवान’ मधील भावनिक अंदाज समोर
विनोद शिवकुमार यांच्याविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी आल्याचा दावा करत, या तक्रारी गांभीर्याने घेण्याची विनंती त्यांनी केली होती. फिल्डवर मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात असल्याचे आणि शिवकुमार यांच्याकडून खराब पद्धतीने बोलले जात असल्याने मानसिक त्रास होत असल्याचेही त्यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले होते.शेवटी “माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार, उपवनसंरक्षक आहेत,” असा आरोप दीपाली चव्हाण यांनी केला होता. मात्र, या आरोपांच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने आता विनोद शिवकुमार यांच्याविरोधातील दोषारोपपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
