Dhananjay Sawant narrowly escaped : सोलापूर-पुणे महामार्गावर बारामतीजवळ गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून देखील, सुदैवाने धनंजय सावंत हे थोडक्यात बचावले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धनंजय सावंत हे आपल्या काही सहकाऱ्यांसह फॉर्च्युनर कारमधून धाराशिवकडे जात होते. बारामतीजवळ भिगवण परिसरातील डाळज 2 गावाजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला. महामार्गावर वेगात धावणाऱ्या कंटेनरने त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. धडक एवढी तीव्र होती की, गाडीच्या चालकाच्या बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आणि कार रस्त्याच्या कडेला फेकली गेली.
अपघातानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात धनंजय सावंत यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसली, तरी त्यांच्या सहकाऱ्यांना किरकोळ मार लागला आहे. गाडीचा मालक आणि सुरक्षारक्षक यांना देखील जखमा झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहूचून पंचनामा केला आणि वाहतूक काही काळासाठी सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. अपघातामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. प्राथमिक अंदाजानुसार, कंटेनरच्या वेग अधिक असल्याने हा अपघात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नेमके कारण समजण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
बर्फवृष्टीतून सुखरूप बाहेर पडले, पण परतीच्या प्रवासात अपघात; पिंपरी-चिंचवडच्या तिघा तरुणांचा मृत्यू
आता या घटनेला राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. धनंजय सावंत यांनी नुकताच आपल्या कुटुंबीय आणि समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष म्हणून लढवून निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे.
धनंजय सावंत हे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे असून, त्यांच्या या पक्षांतरामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. शिंदे गटाच्या शिवसेनेला यामुळे मोठा धक्का बसल्याची चारचा राजकीय वर्तुळात सुरू होती. अशातच भाजप प्रवेशानंतर परतताना झालेल्या या अपघातामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
सुदैवाने या भीषण अपघातातून धनंजय सावंत बचावल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र या घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील वाढत्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भरधाव वेग, निष्काळजीपणा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे असे अपघात वारंवार घडत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने महामार्गांवरील सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. वाहनचालकांनीही वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित वाहन चालवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
