NCP Shirdi Adhiveshan : पक्षाला मिळालेल्या विजयाने हुरळून न जाता जमीनीवर पाय ठेवून काम करा असे आवाहन करतानाच भविष्यात विचारांची…संघटनेची दिशा घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी आज शिबीरात दिले. 2047 पर्यंत एक बलवान पक्ष तयार करण्याची जबाबदारी आपली असून अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंघ करत मनाशी खूणगाठ बांधायची आहे असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.
या शिबिरात सदस्य नोंदणीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) , प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आदींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यामध्ये दहा प्राथमिक आणि एक क्रियाशील कार्यकर्त्याची नोंदणीचा समावेश होता.
शिबीराची सुरुवात पक्षाचे झेंडावंदन करुन करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. पहिल्या दिवशी झालेल्या ‘नवसंकल्प’ शिबीरात ‘राज्याची राजकीय सद्यस्थिती व वेध भविष्याचा’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण, माजी मंत्री सुबोध मोहिते, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे तर ‘वाढते नागरीकरण आणि पक्ष बांधणीचे आव्हान’ या विषयावर नजीब मुल्ला, राजलक्ष्मी भोसले यांनी विचार मांडले.
महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह विभागवार जिल्हाध्यक्षांनी आपले विचार मांडले. ‘महिला सक्षमीकरणात राष्ट्रवादीचे योगदान’ या विषयावर अदिती तटकरे,’ आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्ष बांधणी’ यावर ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी तर ‘कृषी क्षेत्राचे धोरण’ यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, ‘राज्याच्या विकासात आदिवासी समाजाचे महत्त्व आणि योगदान’ याविषयावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विचार मांडले.
सैफ अली खान प्रकरणात मुंबई पोलीस थेट मध्य प्रदेशात, एक संशयित ताब्यात
नवसंकल्प शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते नवाब मलिक,मंत्री हसन मुश्रीफ,मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार सुनेत्रा पवार, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री मकरंद पाटील, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री अदिती तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, पक्षाचे स्टार प्रचारक अभिनेते सयाजी शिंदे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, आदींसह पक्षाचे विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.