Download App

Sambhaji Bhide : अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक करण्याचा बेशरमपणा करु नका; संभाजी भिडे संतापले

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shiv smarak) पुतळा अरबी समुद्रात उभारण्यात येणार आहे. मात्र शिवरायांचा हा पुतळा उभारण्यात येऊ नये, तसेच यासाठी होणारा कोट्यवधीचा खर्च करण्याचा बेशरमपणा करू नका, अशा शब्दात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेंनी (sambhaji bhide) थेट सरकारला सुनावलं आहे.

पुण्याच्या जुन्नरमध्ये गडकोट मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी भिडे बोलत होते. भिडे म्हणाले, राज्यात नको इतके पुतळे आहेत. आता अरबी समुद्रात स्मारक उभारला जात आहे. त्या स्मारकाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा काहीच संबंध नाही.

कोट्यवधी रुपये खर्च करून हे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करण्यात येऊ नये. असे म्हणत एकप्रकारे भिडे यांनी अरबी समुद्रात होणाऱ्या स्मारकाला विरोध केला आहे. आमच्या छत्रपती शिवरायांना इंग्लंडच्या प्रसुतीगृहातून बाहेर काढा. त्यांची जयंती भारतीय हिंदू पंचांगानुसारच झाली पाहिजे, असंही ते म्हणाले.

दरम्यान मागील अनेक वर्षांपासून अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासह शिवस्मारकाच्या प्रकल्पावर काम सुरु आहे. या प्रकल्पासाठी अद्यापही निविदा निघालेली नाही. मात्र या स्मारकाची गरज काय? अशी भूमिका संभाजी भिडे यांनी मांडली आहे.

भिडे पुढे म्हणाले की, जिजामाता 12 जानेवारी रोजी जन्मलेल्या नाही आहेत. पौष पोर्णिमेला जन्मल्या आहेत. ही तिथी मानली पाहिजे, अशा अनेक गोष्टी आहेत. मात्र ‘राज्यात सध्या सरकारं उलथी-पालथी होत आहेत. तो त्यांचा धंदा असला तरी दोन्हीही आपलेच आहेत. महाराष्ट्राची लेकरं राज्य करत आहेत. त्यामुळे ते नेमकं काय करतात ते बघू म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Tags

follow us