जालना : ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) गेल्या चार दिवसांपासून जालन्यात ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) रक्षणासाठी आमरण उपोषणाला बसले असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. आज (दि.17) सरकारच्या शिष्टमंडळाने हाके यांची भेट घेत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी शिष्टमंडळातील भाजपचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी पाणी पिण्याची विनंती केली. एक डॉक्टर म्हणून उपोषणात पाणी चालतं असे कराड यांनी हाके यांना सांगितले. मात्र, कराड यांच्या विनंतीनंतरही हाकेंनी पाणी पिण्यास आणि उपोषण मागे घेण्यास नकार दिला. (Laxman Hake OBC Protest Update)
Manoj Jarange: फडणवीस दुश्मन नाही; 13 जुलैचा उल्लेख करत जरांगेंनी सस्पेन्स वाढवाला
लेखी आश्वासनापर्यंत उपोषणार ठाम
ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत मी माघार घेणार नाही, असा निर्धार लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला. मी 80 टक्के मराठा ओबीसीत घुसवला आहे. जरांगे यांचा हा दावा खरा असेल तर मूळ ओबीसींचे आरक्षण कसे टिकेल, हे सरकारने सांगावे असेही हाके म्हणाले.
त्यांनी पाणी घेतलं नाही तर…
डॉ. भागवतराव कराड यांनी स्वत: लक्ष्मण हाके यांचा रक्तदाब तपासून पाहिला. डॉक्टर म्हणून मला माहिती आहे की, लक्ष्मण हाके यांचा हार्ट रेट वाढलेला आहे. त्यांनी पाणी घेतल नाही तर त्यांना किडनीला त्रास होण्याची शक्यता आहे, असे भागवतराव कराड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
हाकेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य धादांत खोटे आहे. मी आयोगाचा सदस्य आहे. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे माहिती आहेत. राज्य सरकारने कायद्यात खाडाखोड करुन 54 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटली असा गंभीर आरोप करत राज्यात बोगस कुणबी घोटाळा झाला आहे असे हाके म्हणाले. या पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक न्याय उरलाय का? याचं उत्तर मिळाल्याशिवाय मी आमरण उपोषण मागे घेणार नाही, असेही हाकेंनी सांगितले.