मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षपदी डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. दिल्ली विधानसभेचे (Delhi) मतदान आटोपताच काँग्रेसकडून याबाबत घोषणा शक्यता आहे. महाराष्ट्रात मराठा अध्यक्ष नेमायचा, की संविधान बचाव मोहिमेअंतर्गत अल्पसंख्याक, दलित समाजातील नेत्याची नियुक्ती करायची, हा प्रश्न आतापर्यंत पक्षश्रेष्ठींसमोर होता. तो आता सुटला आहे. राऊतांकडे पक्ष सावरण्याची जबाबदारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. (Dr. Nitin Raut’s name has almost been confirmed as the state president of Maharashtra Congress.)
लोकसभेत यश मिळाल्यानंतर काँग्रेसला विधानसभेत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी दुसऱ्या नेत्याचा शोध सुरू होता. शैक्षणिक संस्था व साखर कारखानदार नेत्याकडे ही जबाबदारी द्यावी याबाबत चर्चा झाली. त्यातून सतेज पाटील, विश्वजीत कदम, अमित देशमुख, संग्राम थोपटे अशा नेत्यांच्या नावावर चर्चा झाली. पण हे नेते थेटपणे भाजपच्या विरोधात जायला कचरत होते. पुढे येण्यासाठी कुणी फारशी उत्सुकता दाखवत नव्हते.
त्यामुळे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचेही नाव चर्चेत होते. पण या नेत्यांनीही उत्सुकता दाखविली नाही. अखेर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि माजी मंत्री नितीन राऊत यांची नावे पुढे आली. यात विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांचे समीकरण पाहता, नितीन राऊत यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई महापालिकेला निवडणूक तोंडावर असल्याने वर्षा गायकवाड यांना प्रदेशाध्यक्षपदात अडकवले जाऊ नये यावर पक्षश्रेष्ठींचे एकमत झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 237 जागा जिंकले होते तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर विजय मिळवता आला होता. महायुतीमध्ये भाजपने सर्वाधिक 132, शिवसेना 57, आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागांवर विजय मिळावला होता. तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उबाठा) 20, काँग्रेसने 16 तर राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा जिंकले होते.