लंडनला जाण्यापासून डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखलं; नेमकं काय घडलं?

डॉ. पाटील यांना भारतातून पुन्हा लंडनला जात असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Untitled Design (285)

Untitled Design (285)

Dr. Sangram Patil was prevented from going to London :ब्रिटनचे नागरिकत्व असलेले आणि NHS यूकेमध्ये सल्लागार डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले डॉ. संग्राम पाटील पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. सोशल मीडियावर भाजपविरोधी भूमिका उघडपणे मांडणाऱ्या डॉ. पाटील यांना भारतातून परतताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी कुटुंबासह भारतात आलेल्या डॉ. संग्राम पाटील यांना 10 जानेवारी रोजी त्यांच्या एका फेसबुक पोस्टच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र ही कारवाई अटक नसून केवळ चौकशीपुरती असल्याचे मुंबई गुन्हे शाखेने स्पष्ट केले होते. त्यानंतर डॉ. पाटील यांनी त्याच दिवशी तसेच 16 जानेवारी रोजी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3 येथे हजर राहून आपली लेखी बाजू तपास अधिकाऱ्यांकडे सादर केली होती.

दरम्यान, 19 जानेवारी रोजी सकाळी यूकेला परत जाण्याबाबत त्यांनी तपास अधिकाऱ्यांना आधीच माहिती दिली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले ‘लूक आऊट सर्क्युलर’ मागे घेतले जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात विमानतळावर वेगळीच परिस्थिती निर्माण झाली. 19 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता इंडिगोच्या विमानाने लंडनला जाण्यासाठी डॉ. संग्राम पाटील मुंबई विमानतळावर दाखल झाले. मात्र, इमिग्रेशन काउंटरवर त्यांना थांबवण्यात आले आणि परदेशात जाण्यास परवानगी नाकारण्यात आली. परिणामी, त्यांचा यूकेकडे जाणारा प्रवास अचानक थांबला.

फडणवीस यांची वाटचाल दिल्लीतील सर्वोच्च पदाकडे…, संजय राऊत यांच्याकडून सूचक विधान

या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी शरद धरावे आणि मिलिंद काथे करत असल्याची माहिती आहे. डॉ. संग्राम पाटील यांच्याविरोधात सायबर क्राईम विभागात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच आधारे ‘लूक आऊट सर्क्युलर’ जारी करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात ठाणे पश्चिम येथील निखिल शामराव भामरे यांच्या तक्रारीमुळे झाली. निखिल भामरे हे भाजप महाराष्ट्र प्रदेशाचे सोशल मीडिया सहसंयोजक आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, 14 डिसेंबर रोजी ‘शहर विकास आघाडी’ आणि ‘Dr. Sangram Patil’ या फेसबुक अकाउंटवरून काही आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या होत्या.

या पोस्टमधून राष्ट्रीय नेते आणि भारतीय जनता पार्टीविरोधात अपमानास्पद, दिशाभूल करणारा आणि समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर पसरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच एका महिलेसंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला होता. या आधारावर सायबर क्राईम विभागाने गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला होता. दरम्यान, चौकशीसाठी सहकार्य करूनही आणि लेखी बाजू सादर करूनही डॉ. संग्राम पाटील यांना देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यात आल्याने या प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे. यामुळे राजकीय वर्तुळातही या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version