फडणवीस यांची वाटचाल दिल्लीतील सर्वोच्च पदाकडे…, संजय राऊत यांच्याकडून सूचक विधान
परदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जसे स्वागत होते, त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत झाले.
Indicative statement from Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पाच दिवसांच्या स्वित्झर्लंड दौऱ्यावर आहेत. जागतिक आर्थिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या दावोस समिट 2026 साठी ते रविवारी झ्युरिक येथे दाखल झाले. विमानतळावर पोहोचताच परदेशातील महाराष्ट्रीय समुदायाने पारंपरिक पद्धतीने त्यांचे उत्साहात स्वागत केले. ढोल-ताशांचा गजर, मराठमोळा पेहराव आणि आपुलकीची भावना यामुळे हे स्वागत विशेष लक्षवेधी ठरले.
या स्वागताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या स्वागताबद्दल प्रतिक्रिया देताना एक सूचक विधान केले आहे. त्यांनी झ्युरिकमधील स्वागताचे छायाचित्र शेअर करत म्हटले की, परदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जसे स्वागत होते, त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत झाले, ही बाब प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी आहे.
पंतप्रधान मोदी यांचे परदेशात स्वागत होते अगदी तसेच स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झुरिच येथे करण्यात आले ही प्रत्येक मराठी माणसाला सुखावणारी गोष्ट आहे,
महापालिका निवडणुकीत भरघोस विजय प्राप्त केल्यानंतर फडणवीस यांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय! pic.twitter.com/j7UCq44KrZ— Sanjay Raut (@rautsanjay61) January 18, 2026
‘विराट’ खेळी अपयशी! भारताने सामन्यासह मालिका गमावली, न्यूझीलंडचा ऐतिहासिक विजय
संजय राऊत पुढे म्हणाले की, अलीकडील महापालिका निवडणुकांतील मोठ्या यशानंतर फडणवीस यांची वाटचाल आता दिल्लीतील सर्वोच्च पदाकडे सुरू झाल्याचे संकेत दिसत आहेत. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
दरम्यान, स्वित्झर्लंडमधील दावोस येथे 17 ते 24 जानेवारीदरम्यान जागतिक आर्थिक परिषद होणार असून, या परिषदेत विविध देशांचे नेते, राज्यांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित उद्योगसमूह सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा राज्यासाठी गुंतवणूक आणि जागतिक सहकार्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
