‘विराट’ खेळी अपयशी! भारताने सामन्यासह मालिका गमावली, न्यूझीलंडचा ऐतिहासिक विजय

न्यूझीलंडने याआधी 2024 साली भारताचा कसोटी मालिकेत 3-0 ने धुव्वा उडवला होता. भारताने न्यूझीलंडला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 18T223352.989

न्यूझीलंड क्रिकेट टीमने इतिहास घडवला आहे. (India) न्यूझीलंडने टीम इंडिया विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतावर 41 धावांनी मात केली आहे. न्यूझीलंडने इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये भारतासमोर 338 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताला या धावांचा पाठलाग करताना 50 षटकंही खेळता आली नाहीत. न्यूझीलंडने भारताला 24 बॉलआधी ऑलआऊट केलं. न्यूझीलंडने भारताचा डाव 46 षटकांत 296 धावांवर गुंडाळला.

विराट कोहली याने शतकी खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र विराट आऊट होताच भारताचा पराभव निश्चित झाला. न्यूझीलंडने त्यानंतर उर्वरित झटके देत भारताचा डाव आटोपला. न्यूझीलंडने यासह सामना जिंकला. न्यूझीलंडने अशाप्रकारे या मालिकेत एकूण आणि सलग दुसरा सामना जिंकला. न्यूझीलंडने या विजयासह ही 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. तसेच न्यूझीलंडची ही भारतात एकदिवसीय मालिका जिंकण्याची पहिलीच वेळ ठरली.

 IND vs NZ : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला धक्का, न्यूझीलंडचा 7 विकेट्सनी विजयी

न्यूझीलंडने याआधी 2024 साली भारताचा कसोटी मालिकेत 3-0 ने धुव्वा उडवला होता. भारताने न्यूझीलंडला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडला झटपट 2 झटके दिले. त्यानंतर न्यूझीलंडच्या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र भारताने ही जोडी फोडली. मात्र त्यानंतर डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या जोडीने चौथ्या विकेटसाठी द्विशतकी विक्रमी भागीदारी केली. त्यामुळे न्यूझीलंडला 330 पार मजल मारता आली. डॅरेलने सर्वाधिक 137 धावा केल्या. तर ग्लेनने 106 धावांची खेळी साकारली. तसेच इतरांनीही योगदान दिलं. न्यूझीलंडने अशाप्रकारे 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 337 धावा केल्या. भारतासाठी हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या.

भारतीय चाहत्यांना निर्णायक आणि अटीतटीच्या या सामन्यात 338 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीकडून मोठ्या आणि चांगल्या भागीदारीची अपेक्षा होती. मात्र हे दोघे भारताला अपेक्षित सुरुवात देण्यात अपयशी ठरले. भारताने रोहितच्या रुपात पहिली विकेट गमावली. रोहित चौथ्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर 11 रन्स करुन माघारी परतला. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल सातव्या ओव्हरमध्ये आऊट झाला. न्यूझीलंडने शुबमनला 23 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. मिडल ऑर्डरमधील उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या 2 प्रमुख फलंदाजांनी घोर निराशा केली. श्रेयसने 3 तर केएलने 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे भारताची स्थिती 4 आऊट 71 अशी झाली.

विराट-नितीशची भागीदारी

त्यानंतर विराटने नितीश कुमार रेड्डी याच्यासह भारताचा डाव सावरला आणि भागीदारी उभारली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 88 बॉलमध्ये 88 रन्सची पार्टरनशीप केली. नितीश आऊट होताच ही भागीदारी मोडीत निघाली. नितीशने 53 धावांची खेळी केली. नितीशचं हे पहिलंवहिलं एकदिवसीय अर्धशतक ठरलं. ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने पुन्हा एकदा बॅटिंगने निराशा केली. जडेजा 12 धावांवर माघारी परतला.

विराट-हर्षितची निर्णायक भागीदारी

त्यानंतर मैदानात आलेल्या हर्षित राणा याने विराटला अप्रतिम साथ दिली. या दोघांच्या खेळीमुळे भारताच्या विजयाची आशा वाढली. तर न्यूझीलंडचं टेन्शन वाढलं. या दोघांनी चौफेर फटकेबाजी करत भारताला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. विराटने या दरम्यान 54 वं एकदिवसीय शतक झळकावलं. तर हर्षित पहिलंवहिलं एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केलं. मात्र हर्षित राणा आऊट झाला. भारताने सातवी विकेट गमावली.

हर्षितने 43 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी साकारली. हर्षित आऊट झाला. मात्र विराट असल्याने भारताच्या आशा कायम होत्या. मात्र न्यूझीलंडने भारताला सलग दुसऱ्याच बॉलवर दुसरा झटका दिला. हर्षितनंतर मोहम्मद सिराज आला तसाच पहिल्याच बॉलवर आऊट होऊन मैदानाबाहेर गेला. विराटनंतर त्यानंतर कुलदीप यादव याच्यासह भारताला विजयी करण्यासाठी प्रयत्न केले. विराटने मोठा फटका मारला आणि या प्रयत्नात तो कॅच आऊट झाला. विराटने 108 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्ससह 124 धावांची खेळी केली. तर कुलदीप यादव आऊट होताच भारताचा डाव आटोपला आणि न्यूझीलंडने सामन्यासह मालिका आपल्या नावावर केली.

follow us