Draft voter lists published : पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या 1 नोव्हेंबर 2025 या दिवसापासून मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग (Pune Division) पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यावेळी अपर आयुक्त तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर तसेच नोंदणीकृत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कामगार-विरोधी नवे 4 कामगार कायदे तात्काळ रद्द करा; इंटकचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम यांची मागणी
या कार्यक्रमांतर्गत आत्तापर्यंत पदवीधरसाठी 2 लाख 72 हजार 44 तर शिक्षक मतदार संघासाठी 44 हजार 214 मतदारांनी नोंदणी केली असल्याचे सांगून विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, मतदार याद्या नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत 18 डिसेंबर 2025 पर्यंत नमुना क्रमांक 7 व 8 मध्ये दावे व हरकती दाखल करता येतील. याद्वारे प्रारुप मतदार यादीतील नावांबाबत आक्षेप असल्यास दाखल करता येईल. विद्यमान यादीतून नाव वगळण्यासाठी अथवा नावात दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक 7 सादर करावा लागेल. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या दावे व हरकतींवर सहायक मतदान नोंदणी अधिकारी 5 जानेवारी पर्यंत निकाल देतील. त्यानंतर 12 जानेवारी 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची प्रक्रिया निवडणूक जाहीर होईपर्यंत सातत्याने सुरु राहणार असल्याचे डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी सांगितले.
2026 मध्ये पुणे विभाग (Pune Division) पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी पुणे, कोल्हापूर (Kolhapur), सोलापूर(Solapur), सांगली(Sangali) आणि सातारा(Satara) या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त आहेत. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते मतदार नोंदणीचे काम सुरु असून सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पात्र मतदारांना नाव नोंदणीसाठी प्रवृत्त करावे, असे आवाहनही डॉ. पुलकुंडवार यांनी केले.
