पिकं करपली, चारा संपला; मराठवाड्यात शेतकऱ्यांवर उभ्या पिकात जनावरं सोडण्याची वेळ

17 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने स्वतंत्र दुष्काळी पॅकेज जाहीर करावं अशी मागणी केली.

News Photo   2026 09 04T194745.230

पिकं करपली, चारा संपला; मराठवाड्यात शेतकऱ्यांवर उभ्या पिकात जनावरं सोडण्याची वेळ

राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर (Farmer) मोठं संकट उभं राहिलं आहे. पावसाळ्याचे जवळपास 3 महिने उलटूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांत उभी पिकं पाण्याअभावी करपू लागली आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात परिस्थिती अधिक गंभीर झाली असून काही शेतकऱ्यांनी चाऱ्याअभावी उभ्या पिकांमध्येच जनावरं सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच पशुधनाच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

आष्टी तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं धोक्यात आली आहेत. सोयाबीनसह इतर खरीप पिकांची अवस्था बिकट झाली असून शेतात उभं पीक वाचवणंही कठीण झालं आहे. दुसरीकडं जनावरांसाठी चारा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. एका हताश महिला शेतकऱ्याने जनावरांना चारा आणि पाणी कुठून आणायचं, असा सवाल करत आपली व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे.

पावसाच्या विलंबामुळं शेतकरी संकटात; मराठवाड्यात कुठं किती पाऊस अन् आजच चित्र काय?

या परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. 17 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने स्वतंत्र दुष्काळी पॅकेज जाहीर करावं, जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी, तसंच शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातही पावसाअभावी परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, बाजरी, कपाशी, तूर, मूग, उडीद आणि ऊस या पिकांवर संकट आलं आहे. उभी पिकं करपल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला असून मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत आणि जनावरांसाठी छावण्यांची व्यवस्था करण्याची मागणी जोर धरत आहे.

Exit mobile version