ED Attaches 315 cr worth Assets : जळगावातील प्रसिध्द राजमल लखीचंद ज्वेलर्सवर (Rajmal Lakhichand Jewellers) काही दिवसांपूर्वी ईडीकडून (ED)छापेमारी करण्यात आली होती. या कारवाई दरम्यान, ईडीने तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड, 39 किलोंची सोने-हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते. अशातच आज पुन्हा एकदा ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडवर छापा टाकून 315 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. विविध बॅंकांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली.
Israel Palestine War : गाझातील नागरिकांना 3 तासांची डेडलाईन; इस्त्रायलने नेमकं काय केलं ?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ईडीने जळगावसह राज्यातील इतर भागात मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरएल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड आणि मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडवर छापा टाकला. बॅंक फसवणूक प्रकरणात ईडीने 315 कोटी रुपयांच्या 70 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत कशा कशाचा समावेश आहे, हे अद्याप कळू शकलं नाही.
पीएमएलए कायद्याअंतर्गत 13 ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. यामुळं राजमल लखीचंद ज्वेलर्सची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. या कारवाईमुळं अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
राजमल लखीचंद ज्वेलर्स विविध बॅंकाची फसवणूक करून बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा ईडीने आरोप केला होता. तर त्याआधी सीबीआयने काही महिन्यांपूर्वी याबाबत गुन्हे दाखल केले होते. त्याच आधारावर ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पास सुरू केला होता. या तपासात मनी लाँड्रिंग झाल्याचं उघड झाल्यानंतर ईडीने 18 ऑगस्ट 2023 रोजी जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्स ग्रुपवर छापा टाकला होता. या कारवाईत मोठ्या प्रमाणात दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. यावेळी काही मालमत्ताही सील करण्यात आल्या होत्या. यानंतर आता ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील ७० स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत.