सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; वाचा, त्यांचा राजकीय प्रवास
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. सुनेत्र पवार कोण आहेत आणि कसा आहे राजकीय प्रवास हे आपण जाणून घेऊ.
अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री रिकामं झालं आहे. (Ajit Pawar) गेल्या दोन दिवसांपासून अजित दादांची जागा कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होत होता. आज राष्ट्रवादीच्या गटनेतेपदाची सुत्र हातात घेतल्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. सुनेत्र पवार कोण आहेत आणि कसा आहे राजकीय प्रवास हे आपण जाणून घेऊ.
सुनेत्रा पवार महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; पण देशात कितवा नंबर ?
सुनेत्रा पवार यांचे माहेर धाराशिव जिल्ह्यातले तेर.१८ ऑक्टोबर १९६३ रोजी त्यांचा जन्म झाला. बाजीराव पाटील हे त्यांचे वडिल स्वातंत्र्यसैनिक होते. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण होत. छत्रपती संभाजीनगर येथील एस. बी. महाविद्यालय मधून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली.
शरद पवार यांच्या राजकारणातल्या सख्यातून सुनेत्रा आणि अजित पवारांचे लग्न ठरले. १९८० मध्ये सुनेत्रा या लग्न होऊन बारामतीला आल्या. प्रारंभी त्या अजित पवारांना त्यांच्या दुधाच्या व्यवसायात मदत करत होत्या.
मुंबईत झालेल्या १९८३ च्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर शरद पवार मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात परत आले. तेव्हा अजित पवार आणि सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यात राहायला गेले.
अजित पवार साताऱ्याचे पालकमंत्री असताना महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या सुनेत्रा पवारांना परतताना त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू असलेले गाव दाखवले. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या मूळ सासरी गावी काटेवाडी प्रकल्पाची सुरुवात केली.
सुनेत्रा पवार या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्या आहेत आणि राज्यसभेच्या खासदार होत्या. तसेच त्या बारामती टेक्सटाईल कंपनीच्या अध्यक्षा देखील आहेत. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय कार्यात सक्रिय सहभागी नोंदवलेला आहे. 2010 मध्ये सुनेत्रा पवार यांनी एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया (EFOI) ची स्थापना केली. ही संस्था सेंद्रिय शेती, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी काम करते.
काटेवाडीमध्ये ८० टक्के लोकांकडे शौचालयेही नव्हती. त्यातून आणि निर्मलग्राम आणि ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली.
राज्यातील ८६ गावांमध्ये निर्मलग्राम मोहिमेचे त्यांनी नेतृत्व केले. काटेवाडी निर्मलग्राम तर झालेच शिवाय त्याचे इको व्हिलेज म्हणूनही त्यांनी रुपांतर केले. बारामती परिसर टँकरमुक्त करण्यासाठी त्यांनी ‘प्रोजेक्ट मेघदूत’ही राबवला.
परिसरातल्या स्त्रियांना रोजगार मिळण्यासाठी बारामती मध्ये टेक्सटाईल पार्कला सुरुवात केली. जवळपास १५ हजार महिला या टेक्सटाईल पार्कमध्ये काम करतात. या टेक्सटाईल पार्कचे अध्यक्षपद २००६ पासून सुनेत्रा पवारांकडे आहे.
शरद पवार संस्थापक असलेल्या बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेवर त्या विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. येथे सुमारे २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
पर्यावरणीय जागरूकता वाढवण्यासाठी २०१० मध्ये त्यांनी एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून जलसंधारण आणि वृक्ष लावण्याची कामे केली जातात.
दर आठवड्याला बारामतीचा आवर्जून दौरा करणारे अजित पवार विकासकामांकडे लक्ष देत होते तरी परिसरात लोकसंपर्काची जबाबदारी सुनेत्रा पवार निभावत असायच्या. यामुळेच बारामती परिसरात ‘वहिनी’ ही त्यांची ओळख बनली.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून नणंद सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक झाली. त्या जागेवर १३ जून २०२४ ला उमेदवारी अर्ज दाखल करत सुनेत्रा पवार खासदार झाल्या.
जैवविविधता संवर्धन, जलसंपत्ती व्यवस्थापन आणि दुष्काळ निवारण यावर लक्ष केंद्रित करून व्यापक तळागाळातील मोहिमा राबवण्यासाठी त्यांना प्रतिष्ठित ” ग्रीन वॉरियर अवॉर्ड ” ने सन्मानित करण्यात आले.
२०११ पासून त्या जागतिक उद्योजकता मंच (फ्रान्स) च्या थिंक टँक सदस्य आहेत , शाश्वतता आणि सामाजिक नवोपक्रमावरील आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये भारताचे त्या प्रतिनिधित्व करतात.
भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार व सायबर ग्राम पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
शिक्षण क्षेत्रात योगदान
सुनेत्रा पवार यांनी समाजकारणासह शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त देखील आहेत. या अनुभवाचा त्यांना आगामी काळात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार यांच्या नावावर नवा विक्रम
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर एक मोठा विक्रम झाला आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. या आधी कोणत्याही महिलेने या पदावर काम केलेलं नाही. पवार घराण्याचा राजकीय वारसा पुढे चालवण्याचे काम आता त्या करणार आहेत. संपूर्ण राज्यातून उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची मागणी करण्यात येत होती, त्यानंतर आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं.
