ED Raid at Hasna Mushrif House : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या माध्यामातून चौकशी सुरु आहे. आज पुन्हा ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. आज पहाटेपासून त्यांच्या घरी छापेमारी सुरु झालेली आहे. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी छापेमारी आहे. जवळपास चार ते पाच ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी तपास करत असल्याची माहिती आहे. यावरुन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले आहेत. या छापेमारीवरुन हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ या अत्यंत संतप्त झाल्या आहेत.
हसन मुश्रीफ हे गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडावर आहेत. त्यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आज सकाळीच ईडीचे पथक मुश्रीफांच्या घरी दाखल झाले आहेत. यावरुन मुश्रीफांच्या पत्नी सायरा मुश्रीफ चांगल्याच संतप्त झाल्या आहेत. किती वेळा यायचे याठिकाणी, किती त्रास द्यायचा, रोज तेच काम चालू आहे. एवढं काम करणारा माणूस आहे. दिवसरात्र लोकांसाठी कष्ट करणारा माणूस आहे, असं का करता. आम्ही काय करायचं, आम्हाला एकदाच गोळ्या घालून जायला सांगा, असे त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान हसन मुश्रीफ यांच्यावर अप्पासाहेब नलावड साखर कारखाना खरेदी करताना 100 कोटी घोटाळ्याचा आरोप आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. साखर कारखाना खरेदी करताना काळा पैसा गुंतवल्याचा देखील त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. मुश्रीफ यांच्या जवळच्या व्यक्तींनी कारखाना खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. याआधी 11 जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती.