Gokul Milk Union Election : कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक 10 नोव्हेंबरला होणार आहे. याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, 10 नोव्हेंबरला 11 वाजता निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. 7 दिवसांची नोटीस देऊन निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. तर दुसरीकडे महायुतीचे संचालक 10 तारखेला उपस्थित राहणार का? याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
उच्च न्यायालयाने (High Court) दिलेल्या या आदेशाने महायुती आणि निवडणूक अधिकारीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. समविचारी आघाडीकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वकिलांमध्ये आणि आघाडीच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. समविचारी आघाडीकडून श्रीकृष्ण गणबनवले यांनी न्यायालयात बाजू मांडली.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोणतीही स्पष्ट तारीख न देता सभा तहकूब केली. नैसर्गिक न्यायानुसार, 7 दिवसांच्या आत ही सभा बोलावणे आवश्यक होते. 13 विरुद्ध 12 अशी सरळ लढत झालेली असताना जनमाताचा आदर केला गेला पाहिजे असा युक्तिवाद समविचारी आघाडीकडून श्रीकृष्ण गणबनवले यांनी केला.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने बाजी मारली आहे. एकूण 25 संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत समविचारी आघाडीने 13 जागा जिंकल्या, तर महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला 12 जागा मिळाल्या.
राम मंदिर देणगी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात मोठा खुलासा, आरोपपत्र दाखल-
19 ऑक्टोबर 2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीत महायुतीकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदारांनी प्रचारात ताकद लावली होती. मात्र, सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने एक जागेच्या फरकाने विजय मिळवला.
