गोकुळच्या निकालाने महाडिकांना धक्का; पराभवाचं कारण सांगत सत्तास्थापनेवरही मोठ विधान

Gokul Election : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला बसलेल्या धक्क्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी पराभवामागचं महत्त्वाचं कारण सांगितलं आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 21T172019.386

Dhananjay Mahadik : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आलेला निकाल (Gokul) अनपेक्षित आणि धक्कादायक असल्याची कबुली खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यात आणि महायुतीची भूमिका त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे मांडण्यात कमी पडल्याचं त्यांनी मान्य केलं. महायुतीच्या काही गोष्टी मतदारांना पटल्या नाहीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झालं असावं, असं महाडिक म्हणाले. मतदारांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारला असून, पराभवाची कारणं शोधण्यासाठी आत्मचिंतन करणार आहोत. आमचे 12 सदस्य निवडून आले आहेत आणि आम्ही विरोधात बसणार आहोत. गोकुळमध्ये फोडाफोडीचं राजकारण होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

निवडणुकीच्या निकालावर बोलताना महाडिक यांनी सांगितलं की, जमिनीवरील परिस्थितीचा अंदाज आम्हाला योग्य प्रकारे आला नाही. नव्या आणि जुन्या सदस्यांमधील मतभेदांचाही निकालावर परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. मात्र, पराभवामागे नेमकं एकच कारण असल्याचं सांगता येणार नाही. अद्याप पराभवाचं सविस्तर विश्लेषण केलेलं नसून, आता पुढे जाण्यावर भर दिला जाणार आहे. भविष्यात चांगल्या कामांना सहकार्य करू आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करू, अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजपमध्ये बैठक झाल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या. निवडणुकीच्या काळात शपथा घेणं किंवा मंदिरात जाणं नवीन नसल्याचं सांगत, त्यावरून वेगळे अर्थ काढू नयेत, असंही ते म्हणाले.

निवडणुकीत सगळच आपलं गृहीत धरू नका; गोकुळच्या निकालानंतर सतेज पाटलांचा महाडिकांना टोला

शौमिका महाडिक यांच्या पराभवाबाबत बोलताना धनंजय महाडिक यांनी महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणि उमेदवार निश्चित करण्यासाठी लागलेल्या वेळेकडे लक्ष वेधलं. शौमिका यांनी मागील 5 वर्षे विरोधक म्हणून काम केलं असून, महायुतीमध्ये एकमत होण्यासाठी बराच वेळ लागला. काही मुद्द्यांवर सहमती होत नसल्याने मुख्यमंत्री यांच्यापर्यंत जावं लागलं आणि शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार निश्चित होत नव्हते. या विलंबाचा फायदा विरोधकांना झाला आणि त्यांनी प्रचारात आघाडी घेतली, असं महाडिक म्हणाले. सतेज पाटील यांच्याकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सर्व निर्णय कोल्हापुरातच होणार होते, त्यामुळे मुंबईला जाण्याची गरज नव्हती, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा दिलेल्या उमेदवारामुळे भाजपला मोठा फटका बसेल, असं वाटत नसल्याचं महाडिक यांनी सांगितलं. या मतदारसंघात भाजपची पारंपरिक मतपेढी कायम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना यापूर्वीही भाजपसोबत नव्हती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत असल्याने महायुतीच्या उमेदवारांना त्याचा फायदा होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील आमचे उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

follow us