नागपूर : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले माजी आमदार आशिष देशमुख पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 18 जून रोजी त्यांची घरवापसी होणार आहे. मात्र यानिमित्ताने त्यांचे पक्षांतराचे एक वर्तुळ पूर्ण होणार आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजप आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाले आहेत. (ex mla Ashish Deshmukh will join bjp on 18th June in the presence of Nitin Gadkari)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देशमुख यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. काँग्रेसमधून निलंबनानंतर ते भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र पक्षप्रवेशावेळी त्यांना उमेदवारी किंवा पदाबाबत कोणतेही आश्वासन देण्यात आले नसल्याची माहिती आहे.
आशिष देशमुख हे मुळचे काँग्रेसी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष, मंत्री रणजित देशमुख यांचे ते पुत्र. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ते पुतणे. जिल्ह्यातील राजकारणात न पटल्याने देशमुख यांनी त्यांनी भाजपची वाट धरली. भाजपने २००९ मध्ये सावनेरमधून देशमुख यांना केदार यांच्याविरोधात मैदानात उतरवलं. पण अवघ्या साडे तीन हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपने त्यांना काटोलमधून तिकिट दिले. यात त्यांनी काका अनिल देशमुख यांना पराभूत करुन पहिल्यांदा विधानसभा गाठली.
मात्र काही वर्षांतच देशमुख यांचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विदर्भ विकासाच्या मुद्द्यावर मतभेद झाले. त्यातून त्यांनी फडणवीस सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ते भाजपामध्ये एकाकी पडत गेले. अखेर ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांनी आमदारकीचा अन् भाजपचा राजीनामा दिला. त्यानंतर वर्धा येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र आता पुन्हा एकदा ते भाजपवासी होणार आहेत.
देशमुख यांचं ६ वर्षासाठी काँग्रेस पक्षामधून निलंबन करण्यात आलं आहे. पक्षातील नेत्यांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी शिस्तपालन समितीकडून चौकशी होईपर्यंत देशमुख यांचं निलंबन करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचे ६ वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून आशिष देशमुख हे सातत्याने पक्षविरोधी वक्तव्य करत होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर विनाकारण आरोप केले जात आहे. असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले होते.