अजित पवारांना CM म्हणून फक्त 7 टक्के लोकांची पसंती; शिवतारेंनी डिवचलं

अजित पवारांना CM म्हणून फक्त 7 टक्के लोकांची पसंती; शिवतारेंनी डिवचलं

Vijay Shivtare : शिवसेनेकडून देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात सर्वच वृत्तपत्रांतून प्रसिध्द करण्यात आली. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते आहेत असा दावा करण्यात आला. या जाहिरातीवरून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनीही यावरून मुख्यमंत्री शिंदेना टोला लगावला होता. 74 टक्के लोकांना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नकोत, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare)यांनी जोरदार पलटवार केला आहे. (Vijay Shivtare said only 7 percent people like Ajit Pawar as Chief Minister)

लोकप्रियतेसंदर्भातील सर्वेक्षणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर भाजप नेत्यांनी टीकास्त्र डागलं होतं. अजित पवारांनी देखील मुख्यमंत्री शिंदेवर तोंडसुख घेतलं होतं. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर विजय शिवतारे म्हणाले, अजित पवार काहीही बोलतात. ते मोडून-तोडून विधानं करतात. अजित पवारांनी सर्व्हे केला की नाही माहीत नाही. कारण, सर्वेक्षणानुसार केवळ 7 टक्के लोकांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. अजित पवार दिशाहीन किंवा दिशाभूल करत आहेत. आज त्यांची अवस्था काय आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे, असं शिवतारे म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले?

राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या जाहिरातीवरून अजित पवार यांनी शिंदेंवर टीका करतांना म्हणाले की,
सर्वेक्षणात 26 टक्के लोकांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते. तर 23 टक्के लोकांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते. म्हणजे दोघांची संख्या 50 टक्क्यापर्यंत जाते. तर 50 टक्के लोकांना अन्य मुख्यमंत्री व्हायला हवेत, असा त्याचा अर्थ निघतो, असं अजित पवार म्हणाले. ते म्हणाले की, याशिवाय 26 टक्के विचार केला तर 74 टक्के लोकांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको आहेत, असं टोला अजित पवार यांनी लगावला होता.

दरम्यान, काल वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनंतर भाजपच्या गोटात नाराजीचे वातावरण होते. अनेक भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेवर टीका केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. कारण फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द केला. मात्र, आज एका कार्यक्रमात फडणवीस यांनी एखाद्या जाहिरातीने किंवा एखाद्या वक्तव्याने सरकारमध्ये काही होईल, इतंक हे सरकार तकलादू नाही, असं सांगत आपण नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी आमचं बॉन्डिंग तुटणार नाही, ही फेविकॉल लावलेली जोडी आहे, असं सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube