Maharashtra Election 2026 Exit Poll Results : राज्यातल्या 29 महापालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असून सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या या मतप्रकियेत नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. दिवसभर शांततेत मतदान पार पडले. मतदारांनी दिलेला कौल आता मतपेटीत बंद झाला असून, उद्या म्हणजेच शुक्रवारी 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दरम्यान मतदान प्रक्रिया पूर्ण होताच विविध नामांकित संस्थांचे एक्झिट पोल समोर येऊ लागले आहेत. निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि पुणे महापालिकेबाबतचे विजयी जागांचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे मतदान जरी संपलं असलं तरी, आता सत्ता नेमकी कुणाची याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शाई पुसून पुन्हा मतदान करता येणं शक्य नाही, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
मुंबईत ठाकरेंना धक्का भाजपनं बाजी मारल्याचं चित्र
आजतक ॲक्सिसच्या एक्झिट पोलनुसार मुंबई महापालिकेत भाजपला 130 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर शिवसेनेला 151 जागा मिळू शकतात. ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट मिळून 58 ते 68 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काँग्रेस आणि वंचित आघाडीला 12 ते 16 जागा, तर इतरांना 6 ते 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
जेडीएस संस्थेच्या एक्झिट पोलनुसार मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना युतीला 127 ते 154 जागा मिळू शकतात. महाविकास आघाडीला 44 ते 64 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस आणि वंचित आघाडीला 16 ते 25 जागा, तर इतर पक्षांना कोणतीही जागा मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, लोकशाही आणि रुद्र रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना युतीला 121 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांना मिळून 71 जागा, काँग्रेस व वंचित आघाडीला 25 जागा, तर इतरांना 10 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
29 महापालिकेत महायुतीचा महापौर असेल; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा मोठा दावा
डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार मुंबई महापालिकेत, भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती (महायुती) 107 ते 122 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. ठाकरे बंधूंच्या युतीला 68 ते 83 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला 18 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या युतीला 2 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना 8 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबई महापालिकेत, महायुतीला (महाआघाडी) 42 ते 45 टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे. ठाकरे बंधू आणि शरद पवार यांना 34 ते 37 टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे. काँग्रेस-व्हीबीए युतीला 13 ते 15 टक्के आणि इतरांना 6 ते 8 टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे. जेव्हीसी एक्झिट पोलमध्ये भाजप युतीला 138 जागा, उद्धव ठाकरे यांच्या युतीला 59 जागा, काँग्रेस युतीला 23 जागा आणि इतरांना 7 जागा मिळू शकतात.
पुणे पालिकेत पुन्हा कमळ फुलणार?
दरम्यान, PRAB संस्थेच्या एक्झिट पोलनुसार पुणे महापालिकेत, भाजपला 93 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला 6, ठाकरे गटाला 7, मनसेला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 43, तर शरद पवार गटाला 8 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 8 जागांचा अंदाज आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेबाबत PRAB च्या पोलनुसार, भाजपला 64 जागा, शिवसेना शिंदे गटाला 9 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 51, तर शरद पवार गटाला 2 जागा मिळू शकतात. काँग्रेस आणि मनसेला प्रत्येकी 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, हे सर्व अंदाज एक्झिट पोलवर आधारित असून, महापालिकांचे अंतिम चित्र उद्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
PCMC मध्ये कोणत्या प्रभागात कोण निवडून येणार खालील लिंकवर क्लिक करा..
पुण्यातील कोणत्या प्रभागात कोण निवडून येणार खालील लिंकवर क्लिक करा..
