राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांत फडणवीसांचा आठवडाभरातील दुसऱ्यांदा दिल्ली दौरा ठरतोय निर्णायक

फडणवीसांचा दिल्ली दौरा विशेषतः दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Untitled Design 39

Untitled Design 39

Fadnavis’ second visit to Delhi in a week is proving decisive : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दिल्लीच्या दौऱ्यावर गेल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील घडामोडी वेगाने बदलत असताना फडणवीस यांचा हा सलग दुसरा दिल्ली दौरा ठरतो आहे. यापूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठली होती. मात्र त्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच त्यांनी पुन्हा राजधानीचा रस्ता धरल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल, अनेक महापालिकांमधील महापौर-उपमहापौर निवडीची समीकरणं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणावरून सुरू असलेल्या हालचाली, या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीसांचा दिल्ली दौरा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असून, त्यावरून वेगवेगळ्या नेत्यांची परस्परविरोधी वक्तव्ये समोर येत आहेत.

दरम्यान, फडणवीस दावोस दौऱ्यावर असताना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे नितीन नवीन यांनी स्वीकारली. भाजप मुख्यालयात त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास फडणवीस उपस्थित राहू शकले नव्हते. त्यानंतर ते दिल्लीला गेले असता नितीन नवीन बिहार दौऱ्यावर असल्याने प्रत्यक्ष भेट घडू शकली नव्हती. मात्र यावेळी दिल्ली भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडे दुहेरी जबाबदारी; फडणवीसांनी वित्त खाते स्वतःकडे का ठेवले? पडद्यामागची चर्चा उघड

मुख्यमंत्री दिल्लीला एका वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमासाठी गेले होते, अशीही माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी नितीन नवीन यांची स्वतंत्र भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसली, तरी राज्यातील आगामी राजकीय घडामोडी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तास्थापना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाचा मुद्दा यावर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील जिल्हा परिषद निकालांनंतर काही ठिकाणी सत्तास्थापनेबाबत अनिश्चितता आहे. महापालिकांमधील महापौर-उपमहापौर निवडीसाठीही भाजपला रणनीती आखावी लागणार आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय नेतृत्वाशी समन्वय साधणे आवश्यक असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण झाल्यास राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही ही निर्णायक घडी ठरू शकते.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नेत्यांनी विलिनीकरणाबाबत सावध भूमिका घेतली आहे. काहींनी सकारात्मक संकेत दिले असले, तरी काहींनी ही केवळ चर्चा असल्याचे म्हटले आहे. भाजपकडूनही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. एकूणच, राज्यात राजकीय अनिश्चिततेचे वातावरण असताना मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा दौरा केवळ औपचारिक भेटीपुरता मर्यादित नसून, आगामी राजकीय रणनीती ठरवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आता या भेटींचे पडसाद पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात कसे उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version