Father and 2 children die after being buried under a pile : छत्रपती संभाजीनगरमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली. विहिरीच्या कामादरम्यान ढिगाऱ्याखाली दबुन वडील आणि दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावात ही घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा शिवारात विहिरीचे काम सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वडील आणि दोन तरुण मुलांचा समावेश आहे. बाजीराव सर्जेराव काकडे, अजिनाथ बाजीराव काकडे आणि शाम बाजीराव काकडे अशी तिन्ही मृतांची नाव आहेत. ही घटना ९ मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. नवरा आणि दोन मुलांच्या मृत्यूमुळे बाजीराव काकडे यांच्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली.
Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकर आज SIT समोर हजर होणार
विहिरीचे काम सुरू असताना रात्री विहिरीत पाणी साचले. हे पाणी काढण्यासाठी तिघेही बापलेक विहिरीच्या काठावर उभे होते. मात्र माती असल्याने विहीर ढासळली आणि त्यामुळे तिघे देखील विहिरीत कोसळले. त्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडल्यामुळे तिघे देखील त्या ढिगाऱ्याखाली दबले. स्वतःचा जीव वाचवण्याची संधी देखील त्यांना मिळाली नाही. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मातीचा ढिगारा हटवून त्यांनी तिघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणी आणि चिखल यामुळे तिघांचा देखील श्वास गुदमरून मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण धानोरा गावावर शोककळा पसरली.
