छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; दुचाकी-पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू

पैठण तालुक्यातील विवाहमांडवा–चौंडाळा रोडवर दुचाकी आणि पिकअप वाहनामध्ये झालेल्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 32

Four people died on the spot in the accident : राज्यातील रस्ते अपघातांच्या घटना दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या पिकअप वाहनाला झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची वेदना अद्याप ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणखी एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. पैठण तालुक्यातील विवाहमांडवा–चौंडाळा रोडवर दुचाकी आणि पिकअप वाहनामध्ये झालेल्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोड येथील आठवडी बाजार आटोपून चव्हाण कुटुंब आपल्या गावाकडे परतत होते. दुचाकीवरून खंडाळा येथील पारधी वस्तीकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील चारही जण गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात दोन महिलांचा, एका पुरुषाचा आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर रस्त्यावर मोठी गर्दी झाली असून घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले.

पंतप्रधान मोदी तब्बल 45 मिनिटं विमानतळावर वाट पाहत थांबले, काय होतं कारण?

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दुचाकीवरील चारही जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पाचोड पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पाचोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच अपघात नेमका कशामुळे झाला, पिकअप वाहनाचा वेग किती होता आणि चालकाची काही चूक होती का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका निष्पाप चिमुकल्यासह चार जणांचा जीव गेल्याने नागरिकांनी दु:ख व्यक्त केले आहे. राज्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, वेगावर नियंत्रण आणि रस्ते सुरक्षेबाबत अधिक जागरूकता आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.

follow us